लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील विविध भागात एकटे राहणाऱ्या वृद्ध दाम्पत्याचे कोरोना काळात हाल झाल्याची परिस्थिती आहे. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने देखील त्यांच्याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष नसून काही पोलीस ठाण्यात त्यांच्या हद्दीतील वृद्धांच्या संख्येची नोंद करण्यात आलेली नाही. त्यामुळे कोरोना काळात या एकट्या राहणाऱ्या वृद्धांची सुरक्षा रामभरोसे असून, त्यांना आधाराची गरज आहे.
शहरामध्ये अनेक वृद्ध एकटे राहत आहेत. यामध्ये महिला तसेच पुरुषांचा समावेश आहे. मुले-सुना नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी असतात. काहींचे परदेशात असतात. त्यामुळे या वृद्धांना कोरोना काळात अनेक गोष्टींची गरज असताना देखील त्या गरजा पूर्ण करणे कठीण झाले. दरम्यान, अशा वृद्ध दाम्पत्यावर लक्ष ठेवून त्यांना लुटण्याचे प्रकार देखील शहरात अनेकवेळा घडले आहेत त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत वृद्धांकडून व्यक्त केले जात आहे.
औषध आणण्यासाठी शेजारच्यांनी केली मदत
लॉकडाऊनच्या काळात मेडिकल सुरू होते; मात्र वाहतूक व्यवस्था बंद असल्याने वृद्धांची अवस्था बिकट झाली होती. काही वेळा शेजारी व नातेवाईकांनी औषधी आणण्यासाठी मदत केली, तर काहीवेळा त्यांनाच पायपीट करावी लागली.
काही पोलीस ठाण्यात वृद्धांची नोंद नाही
पोलीस ठाणे हद्दीतील एकट्या राहणाऱ्या वृद्धांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस ठाण्यात नगरपालिकेच्या मदतीने नोंदणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यांच्या गोपनीय विभागामध्ये वृद्धाची नोंद केली जाते. तर काही पोलीस ठाण्यांमध्ये तशी कुठलीही नोंद नाही.
पोलिसांकडून कायम होते मदत
पोलीस ठाण्यात वृद्ध नागरिक काही कारणास्तव आले तर त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यावर कारवाई करण्याच्या दृष्टीने तत्काळ कार्यवाही केली जाते. तसेच वृद्धांना कायम मदत करण्याचा हेतू पोलीस प्रशासनाचा असल्याचे मत अधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच वृद्ध व्यक्तीचा पोलीस ठाण्यात फोन आल्यानंतर तत्काळ पोलीस प्रशासनाकडून त्यांना मदत केली जाते.
नेहमी कॉलनीत पोलिसांची गस्त असते
मुलगा व सून बाहेरगावी राहतात़ त्यामुळे मी एकटाच राहतो. इतर वेळा सहसा त्रास होत नाही. पण कोरोना व लॉकडाऊनच्या काळात अनेक अडचणी समोर उभ्या राहिल्या होत्या. पोलिसांकडून नेहमी कॉलनीत गस्त घातली जाते. तसेच पोलीस ठाण्यांचे क्रमांक सुद्धा घरातील डायरीमध्ये लिहून ठेवले आहे.
- एक वृद्ध
----
काही व्याधी नसल्यामुळे अद्याप कसला त्रास नाही. परंतु, कोरोना काळात माझ्या सारख्या अनेक वृद्धांचे हाल झालेत. त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. मदत कोणाकडे मागावी, हे देखील त्यांना कळत नाही.
- एक वृद्ध