जळगाव : लाॅकडाऊन आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शहरात फेरफटका मारणाऱ्या सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना पाहून मद्यपी पोलिसाने चक्क दुचाकी सोडून पलायन केल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता पोलन पेठेत घडली.
दरम्यान, दीपक सोनवणे असे मद्यपी पोलिसाचे नाव असून तो शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. कुमार चिंथा यांच्या आदेशाने सोनवणे यांचा शहर पोलिसांनी शोध घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्याचे प्रमाणपत्र कुमार चिंथा यांच्याकडे पाठवण्यात आले आहे. या पोलीस कर्मचाऱ्याने किती प्रमाणात मद्यप्राशन केले हे अजून स्पष्ट झालेले नाही, मात्र त्याचा अहवाल पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात येणार असल्याची माहिती कुमार चिंथा यांनी 'लोकमत'ला दिली.
दुचाकीला लावलेल्या पोलीस दंडूक्याने फुटले बिंग
पोलन पेठेत बुधवारी काही मद्यपींचा घोळका होता. त्याचवेळी कुमार चिंथा हे ताफ्यासह या भागातून जात होते. हा घोळका पाहून ते थांबताच मद्यपींनी तेथून धूम ठोकली.त्यावेळी पलायन केलेल्या एकाच्या दुचाकीला पोलीस दंडूका लावलेला चिंथा यांच्या निदर्शनास आले. त्यांनी शहर पोलीसांना दुचाकी ताब्यात घेण्यासह मालकाचा शोध घेऊन जिल्हा रुग्णालयात तपासणी करण्याच्या सूचना दिल्या.चौकशीत ही दुचाकी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी दीपक सोनवणे यांची असल्याचे निष्पन्न झाले. दीपक सोनवणे हे ड्युटीवर नसल्याची माहिती प्राप्त झाली. मद्यप्राशन किती प्रमाणात केले हे रुग्णालयचा अहवाल पाहिल्यावरच सांगता येईल, असे सांगून कुमार चिंथा यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याचे स्पष्ट केले.