लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आरटीईतंर्गत पहिल्या प्रवेश फेरीसाठी जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एसएमएस पाठविण्यात आले असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
आरटीईतंर्गत राखीव २५ टक्के जागांवर दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात असतो. यंदा आरटीईची प्रवेश प्रक्रियेला ३ मार्चपासून प्रारंभ झाली. जळगाव जिल्ह्यातील २९६ शाळांमधील ३ हजार ६५ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. ३ ते ३० मार्च या कालावधीत जळगाव जिल्ह्यातून ५ हजार ९३९ अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते.
७ एप्रिलला निघाली होती सोडत
७ एप्रिल रोजी आरटीईची सोडत काढण्यात आली होती. मात्र, या दिवशी शिक्षण विभागाकडून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली नव्हती. गुरूवारी दुपारी ३ वाजता निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील २ हजार ६९५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. तर १ हजार ९६५ विद्यार्थ्यांचा प्रतीक्षा यादीत समावेश आहे.
एसएमएसवर अवलंबून राहू नका
अनेकवेळा पालकांना एसएमएस प्राप्त होत नाही. त्यामुळे पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता, आरटीईच्या पोर्टलवर लॉगिन करून प्रवेशाचा तारखा पाहण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. तसेच प्रवेशासाठीच्या तारखा सुध्दा एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जावू नये असेही शिक्षण विभागाने कळविले आहे.