महावितरणच्या ८० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण
जळगाव : महावितरण प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून जळगाव परिमंडळातील प्रत्येक कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ८० टक्के कर्मचाऱ्यांनी कोरोना लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस घेतला आहे. लसीकरणासाठी समन्वय समितीही स्थापन करण्यात आली असून, समन्वय कक्षही सुरू करण्यात आला आहे. येत्या १५ दिवसात जळगाव परिमंडळात १०० टक्के कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार असल्याचे महावितरण प्रशासनाने कळविले आहे.
सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे अपघात धोका
जळगाव : शहरातील कोर्ट चौक, टॉवर चौक, आकाशवाणी चौक, चित्रा चौक या ठिकाणचे सिग्नल काही दिवसांपासून बंद असल्यामुळे, रस्त्यावरील वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे अपघात घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या चौकांमध्ये वाहतूक पोलीसही उभे राहत नसल्यामुळे, रस्ता ओलांडताना पादचारी नागरिकांची गैरसोय होत आहे. तरी शहर वाहतूक विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.