पहूर, ता.जामनेर : माझी वसुंधरा हे लोकसभाग चळवळीचे अभियान असून यात लोकांचा सहभाग वाढवून विकास कामांच्या मूल्यांचे संवर्धन करा व शासनाने दिलेल्या संधीचे सोने करण्याची संधी प्राप्त झाल्याने यश तुमच्याच हातात आहे, असे मार्गदर्शनपर आवाहन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पी.सी शिरसाट यांनी पहूर येथे केले. माझी वसुंधरा शासनाच्या अभियाना अंतर्गत होणाऱ्या स्पर्धेसाठी जामनेर तालुक्यातून एकशे सहा ग्रामपंचायतींपैकी एकमेव पहूर पेठ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यासाठी पेठ ग्रामपंचायतीला जिल्हा व तालुका स्तरावरील समितीने भेट दिली.
यादरम्यान पालकत्व म्हणून डीआरडीएचे प्रकल्प संचालक पी.सी शिरसाट यांनी पेठ ग्रामपंचायतीत झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी सरपंच नीता पाटील होत्या.यावेळी उपसरपंच श्यामराव सावळे, गटविकास अधिकारी ज्योती कवडदेवी, कृषी अधिकारी आर.एन पाटील, विस्तार अधिकारी अशोक पालवे, शेतकी संघ संचालक साहेबराव देशमुख, जि.प.चे माजी सदस्य राजधर पांढरे, माजी सभापती प्रदीप लोढा, एस.आर.पाटील, सलीम शेख गनी, ग्रामविकास अधिकारी डी.पी.टेमकर, पिंपळगावचे पंडित पाटील, समाधान पाटील, शरद पांढरे यांच्यासह अंगणवाडी सेविका, शिक्षक व पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सेंट्रल रेल्वे बोर्ड सदस्य रामेश्वर पाटील, तर सूत्रसंचालन आर.बी.पाटील व आभार भारत पाटील यांनी मानले.तत्कालीन सरपंच प्रदीप लोढा यांच्या कार्यकाळात दलित वस्ती सुधारणा अंतर्गत जिल्हा व विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून, अन्य स्पर्धांमध्ये यश मिळविले आहे. तसेच सरपंच नीता रामेश्वर पाटील यांनीही अवघ्या अडीच वर्षात ह्यलोकमतह्ण सरपंच ऑफ द इयर जिल्हा स्तरावर व राज्यस्तराव गेल्या वर्षी पटकविण्याचा बहुमान गावाला मिळवून दिला आहे, असेही याठिकाणी नमूद करण्यात आले.