विविध मागण्यांसाठी घरेलू कामगारांचा मोर्चा
जळगाव : घरेलू कामगार महिलांना शासनाने जाहीर केलेली दीड हजार रूपयांची रक्कम तत्काळ देण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी सोमवारी जिल्हा कामगार युनियनतर्फे जुने बी. जे. मार्केट येथील सहायक कामगार आयुक्तांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. घरेलू कामगारांची नोंदणी तत्काळ सुरू करुन त्यांना अर्थसहाय्य द्यावे, तसेच अर्थसहाय्य देताना सरकारी ओळखपत्र किंवा बँक पासबुकची झेरॉक्स वगळता कुठलेही कागदपत्रे मागू नये, आदी मागण्यांचे निवेदन सहायक कामगार आयुक्तांना देण्यात आले.
दिव्यांग डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
जळगाव : रेल्वे प्रशासनातर्फे दिव्यांग बांधवांच्या डब्यातून प्रवास करण्याला इतर प्रवाशांना मनाई आहे. असे असताना देखील अनेक प्रवासी दिव्यांग बांधवांच्या डब्यातून प्रवास करत असल्याने, दिव्यांग बांधवांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी दिव्यांग बांधवांमधून करण्यात येत आहे.
मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी
जळगाव : व. वा. वाचनालयाकडून रेल्वे मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबून चिखल झाला आहे. यामुळे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. पथदिवे नसल्यामुळे रात्रीच्या वेळी तर अधिकच गैरसोय होत आहे. तरी मनपा प्रशासनाने मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.