लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हा महासचिवपदी विजय सुरवाडे यांची निवड करण्यात आली आहे. बाळासाहेब मिसाळ पाटील व अमजदभाई रंगरेज यांच्या हस्ते नियुक्तिपत्र देण्यात आले आहे.
खरेदीला उसळली गर्दी
जळगाव : गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पिंप्राळा परिसरात खरेदी करण्यासाठी नागरिकांची चांगलीच गर्दी उसळली होती. या ठिकाणी कुठलेही सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
पोस्टाने पाठविणार प्रमाणपत्र
जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा दीक्षान्त समारंभ ३ मे रोजी सकाळी साडेदहा वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा विद्यार्थ्यांना पोस्टाने प्रमाणपत्र पाठविण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी दिली
शासनाच्या निर्णयाचे स्वागत
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे जळगाव जिल्हा एनएसयूआयच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. संसर्ग कायम राहिल्यास दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनादेखील सरसकट पास करून पुढील वर्गात प्रवेश द्यावा, अशी मागणी देवेंद्र मराठे यांनी केली आहे.
पीक कर्ज वाटप एटीएमने नकोच...
जळगाव : जिल्हा बँकेमार्फत मिळणाऱ्या कर्जाची वाटप ही पूर्वीसारखी स्थानिक बँकेतच करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदवीधर विभागाचे जिल्हा सरचिटणीस गोपाल पाटील यांनी केली. मागील काळात कर्जवाटप ही व्यवस्थित सुरू असताना मध्येच एटीएमच्या माध्यमातून वाटप करून प्रशासनाने शेतकऱ्यांचा मनस्ताप वाढविला आहे. या पद्धतीमुळे शेतकऱ्यांना विविध त्रासांसोबत आर्थिक भुर्दंडसुद्धा भोगावा लागत आहे. कारण या बँकेची स्वतःची एटीएम सेवा नसल्याकारणाने इतर ठिकाणी कपात दर देऊन पैसे काढावे लागत आहे. त्यामुळे कर्ज वाटप पद्धत पूर्वीसारखी स्थानिक शाखेत करावी अशी मागणी केली आहे.