लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी गुटखामुक्त जिल्हा करण्याचे जाहीर केलेले असतानाच शहरात चक्क पोलीस चौकीच्याच शेजारी गुटख्याची विक्री होत असल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे व पथकाने इच्छादेवी चौकाशेजारी असलेल्या दुकानातून ३४ हजार ४८० रुपयांचा गुटखा जप्त केला असून, पंकज हुकूमचंद अग्रवाल (रा. सागरनगर, जळगाव) याच्याविरुध्द रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हद्द रामानंदची, चौकी एमआयडीसीची
परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक नितीन गणापुरे, कॉन्स्टेबल संदीप बिऱ्हाडे, फारुख शेख व अमोल करडेकर यांच्या पथकाने शनिवारी दुपारी इच्छादेवी पोलीस चौकीशेजारील निर्मल किराणा येथे धाड टाकली असता, तेथे पाच प्रकारचा गुटखा आढळला. याप्रकरणी पंकज अग्रवाल याला ताब्यात घेण्यात आले असून, हा गुटखा त्याने कोणाकडून आणला व कुठे कुठे त्याची तस्करी होते, याची चौकशी गणापुरे करत आहेत. ज्या दुकानात गुटखा सापडला ते दुकान रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते तर तेथे असलेली पोलीस चौकी ही एमआयडीसी पोलीस स्थानकाच्या हद्दीत आहे.