जळगाव : महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर होऊन अवघे १४ महिने पूर्ण झाले असतानाच, शिवसेनेच्या सत्तेला पुन्हा सुरुंग लावण्याची तयारी सुरू झाली आहे. आता विद्यमान महापौर, उपमहापौर यांच्याबाबत शिवसेनेतील बंडखोर नगरसेवक, शिवसेना व भाजपच्या नगरसेवकांनी मोट बांधली असल्याची माहिती मनपाच्या सूत्रांनी दिली आहे. ही रणनिती आखण्यासाठी रविवारी मेहरूण शिवारातील एका शेतात बंडखोर नगरसेवक, भाजप नगरसेविकेचे पती, शिवसेनेचे नगरसेवक अशी मिळून पार्टी झाली असल्याची माहितीही मनपाच्या सूत्रांनी दिली आहे.
या पार्टीमध्ये महापौरांसह उपमहापौर बदलाबाबतची चर्चा झाली. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे जाऊन भेट घेण्याबाबतदेखील नगरसेवकांची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आठवडाभरापूर्वीदेखील बंडखोर नगरसेवकांच्या एका गटाने नगरविकास मंत्र्यांची भेट घेतली होती. या भेटीत काही प्रभागातील कामांसाठी निधीची मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली होती. दरम्यान, काही नगरसेवकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत देखील चर्चा केली होती. याप्रकरणी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता, कोणताही बदल होणार नसल्याचे ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
या मुद्यांवर झाली चर्चा१. शिवसेनेची सत्ता असून, तीच सत्ता कायम ठेवायची मात्र महापौर-उपमहापौर बदल करण्यात यावा.२. महापौर म्हणून ज्योती तायडे तर उपमहापौर म्हणून ॲड. दिलीप पोकळे यांचे नाव पुढे करण्याबाबत चर्चा झाली.३. भाजप गटनेतेपदाच्या वादावर तोडगा काढून, गटनेतेपदाची याचिका मागे घेण्याबाबतदेखील चर्चा झाली.४. महापौर, उपमहापौरबद्दल करून, स्थायी समिती गठित करून, स्थायी समिती सभापतीपद भाजपला देण्याची या बैठकीत खलबतं झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राजीनामा दिलाच नाही, तर फिल्डिंग लावूनही फायदा नाही१. नगरसेवकांच्या एका गटाने महापौर, उपमहापौरबदलासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.२. मात्र, अडीच वर्षात महापौरांविरोधात अविश्वास ठराव आणता येऊ शकत नाही.३. नगरसेवकांनी दबाव टाकला तरी महापौर, उपमहापौरांनी राजीनामा दिला नाही तर फिल्डिंग लावून फायदाच नाही.४. पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर महापौर, उपमहापौरांनी स्वेच्छेने राजीनामे दिले तरच महापालिकेत बदल होऊ शकतो अन्यथा नाही.
या नगरसेवकांचा होता समावेशमेहरूण परिसरातील एका शेतात रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ही पार्टी रंगली. या पार्टीत ॲड. दिलीप पोकळे, नवनाथ दारकुंडे, कुंदन काळे, गोकूळ पाटील, प्रशांत नाईक, भरत कोळी, रियाज बागवान यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.