मुक्ताईनगर : आमदारांनी शहराच्या विकास कामात भेदभाव करू नये या भाजपने घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान उपनगराध्यक्ष मनीषा पाटील यांनी केलेल्या आरोपांना शिवसेना गटनेते राजेंद्र हिवराळे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप फेटाळले. कोरोना काळात दिवसरात्र रुग्णसेवा करून आमदार चंद्रकांत पाटील यांनी शहरात विविध प्रभागांसाठी कोट्यवधींचा निधी आणल्याचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी, प्रशांत पाटील, वसंत भलेभले, नगरसेवक संतोष मराठे उपस्थित होते.
शहरातील विकासकामांवर लक्ष न देता बगिचे विकसित केले गेले. १५-२० कोटी रुपये कुठे खर्च केले याचा लेखाजोखा जनतेसमोर मांडायला हवा. नगरपंचायत झाल्यानंतर सुरुवातीला आलेला निधी हा रस्ते, गटारी या पायाभूत कामांसाठी आला होता व तो नेहमीप्रमाणेच नगरपंचायतीत रूपांतर झाल्यानंतर दिला जातो. मात्र आमदार पाटील यांनी साडेचार कोटींची कामे एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर करून आणली होती. त्यात प्रभाग क्रमांक एकमधील नागेश्वर मंदिर येथे ६५ लाखांचे सभागृह, प्रभाग क्रमांक १, २, ३, ४, १० व ११, १३ या भाजप नगरसेवकांच्या प्रभागाची कामे मंजूर केली होती. भेदभाव करायचा असता तर भाजप नगरसेवकांच्या प्रभागात कामे आणली असती का? बऱ्हाणपूर रस्त्यावर अत्याधुनिक स्मशानभूमीचा समावेश होता, पण नेत्यांच्या राजकारणामुळे आपण हा विषय नगर पंचायत सभेत घेतला नाही व मंजुरी मिळाली नाही. शेवटी नाईलाज म्हणून बांधकाम विभागाकडे आमदार पाटील यांनी ते काम वर्ग केले. तुमची मानसिकता असेल तर सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन समस्या सादर केल्यास आमदार त्याही नक्की पूर्ण करतील असा चिमटाही गटनेते हिवराळे यांनी याप्रसंगी काढला.