लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपाच्या महापौर व उपमहापौर पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी भाजपचा प्रतिभा कापसे यांचा १५ मतांनी पराभव करीत महापौरपदी विराजमान झाल्या. जयश्री महाजन यांना ४५ मतं मिळाली , तर प्रतिभा कापसे यांना ३० मते मिळाली. तर उपमहापौरपदी देखील भाजपचे बंडखोर उमेदवार कुलभूषण पाटील यांनी भाजपचे उमेदवार सुरेश सोनवणे यांचा पंधरा मतांनी पराभव केला आहे. भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएम च्या ३ नगरसेवकांनी देखील शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने बहुमतापेक्षाही जास्त मते मिळविली. सांगली महापालिकेनंतर भाजपच्या करेक्ट कार्यक्रम करून, जळगाव मनपाची सत्ता देखील भाजपच्या हातातून हिसकावली आहे.
मनपाचा २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेचा एकतर्फी पराभव करून ७५ पैकी ५७ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळविले होते. मात्र अडीच वर्षातच भाजपला महापालिकेतील सत्ता गमवावी लागली आहे. आमदार सुरेश भोळे यांच्याविरुद्ध असलेली नाराजी, तक्रारींची दखल न घेणे, भाजप कडून देण्यात आलेल्या उपमहापौर पदाच्या उमेदवाराला असलेला विरोध यामुळे भाजपचे तब्बल २७ नगरसेवक शिवसेनेला जाऊन मिळाले. त्यानुसार गुरुवारी झालेल्या ऑनलाइन निवडणुकीत शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे यश मिळवत भाजप उमेदवारांना धूळ चारली आहे.
भाजपची चमत्काराची अपेक्षा ठरली फोल
भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन हे भाजपसाठी गेल्या काही वर्षांपासून संकट मोचक ठरत आहेत. त्यामुळे मनपातील भाजपचे संकट गिरीश महाजन हे दूर करतील अशी अपेक्षा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना लागून होती. मात्र, या निवडणुकीत भाजपच्या करेक्ट कार्यक्रम करून संकट मोचकाला देखील भाजपचे हे संकट टाळता येऊ शकले नाही. भाजपने फुटलेल्या नगरसेवकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला मात्र भाजपचे सर्व प्रयत्न अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले.
राष्ट्रवादीचा ''सांगली पॅटर्न'' नंतर शिवसेनेचा ''जळगाव पॅटर्न''
गेल्या महिन्यात सांगली महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना देखील, राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा महापौर बसवला. राष्ट्रवादीने घालून दिलेल्या सांगली पॅटर्नची पुनरावृत्ती शिवसेनेने जळगाव महापालिकेत केली आहे. शिवसेनेने भाजपचे तब्बल २७ नगरसेवक आपल्या बाजूने खेचत जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला आहे.
एम.आय.एम. चा ही शिवसेनेला पाठिंबा
अकोला महापालिकेत स्थायी समितीच्या सभेत एम.आय.एम. व शिवसेनेने केलेला युतीचा फायदा सेनेला झाला नाही, मात्र , जळगाव महापालिकेत एम.आय.एम. शिवसेना उमेदवाराला दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेनेचा महापौर होण्याचा मदत मिळाली आहे. महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीत एम.आय.एम.च्या तिन्ही नगरसेवकांनी शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले आहे.
जयश्री महाजनांच्या अर्जाला भाजपकडून हरकत
महापौर आणि उपमहापौर निवडीला प्रारंभ झाल्यानंतर नगरसचिवांनी उमेदवारांचे अर्ज वाचून दाखवले शिवसेनेच्या महापौर पदाच्या उमेदवार जयश्री महाजन यांचा अर्ज वाचून दाखविल्यानंतर सूचक आणि अनुमोदक असलेले नितीन लढ्ढा आणि प्रशांत नाईक यांचे नाव गॅझेटनुसार नसल्याचे सांगत भाजपच्या नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी त्यावर हरकत घेतली आहे. पिठासन अधिकाऱ्यांना हरकत नोंद करण्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, पीठासीन अधिकाऱ्यांनी ॲड. शुचिता हाडा यांची हरकत फेटाळून लावली. यासह भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी सभा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात यावी व सध्याची सभा रद्द करण्याची मागणी केली. मात्र राज्य शासनाने दिलेल्या परवानगीनुसार ही सभा घेतली जात असल्याचे सांगत पीठासीन अधिकाऱ्यांनी बालानी यांची ही मागणी फेटाळून लावली.
भाजप सर्वोच्च न्यायालयात जाणार
मनपाच्या महापौर, उपमहापौर निवडप्रसंगी शिवसेनेच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या अर्जाला भाजपकडून हरकत घेण्यात आली. पिठासन अधिकाऱ्यांनी भाजपची हरकत फेटाळून लावत अर्ज वैध ठरवला आहे. दरम्यान, पिठासन अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी दिला आहे.