महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा पूर्व परीक्षा : ४८९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणूक
जळगाव : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या परीक्षार्थ्यांना ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असल्यास अशा उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येणार आहे. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ४८९ अधिकारी, कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा २१ मार्च रोजी प्रथम सत्र सकाळ १० ते दुपारी १२ व व्दितीय सत्र दुपारी ३ ते सायंकाळी ५ या कालावधीत जळगाव शहरातील १६ उपकेंद्रांवर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरीता जिल्ह्यातून ६ हजार २६४ परीक्षार्थी परीक्षा देणार आहे. सदर परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण ४८९ अधिकारी, कर्मचारी वर्गाची नेमणूक करण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. याविषयी मार्गदर्शन सूचना जारी करण्यात आल्या आहेत. परीक्षार्थींना सकाळ सत्रासाठी सकाळी ८.३० पासून ते ९.३० पर्यंत व दुपार सत्रासाठी दुपारी १.३० ते २.३० वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार असून उपस्थित सर्व उमेदवारांची तपासणी केली जाणार आहे.
शरीराचे तापमान नियंत्रणात हवे
ताप, खोकला, थंडी इत्यादी प्रकारची लक्षणे असलेल्या अथवा ३८ डिग्री सेल्सिअस अथवा १००.४ डिग्री फॅरेनहाईट पेक्षा जास्त तापमान असलेल्या उमेदवारांची बैठक व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षार्थी यांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करणे आवश्यक राहणार आहे. तसेच सदर परीक्षेकरीता नियुक्त सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच उमेदवार यांना खालीलप्रमाणे साहित्य पुरविण्यात येणार आहे.
परीक्षार्थींना सोडण्यासाठी एका व्यक्तीस सूट
जळगाव शहरात परीक्षेच्या दिवशी परीक्षेसाठी शाळा, महाविद्यालय सुरू राहतील तसेच परीक्षार्थींसाठी जिल्हांतर्गत प्रवासी वाहतूक प्रवासासाठी सुरू राहणार असून परीक्षार्थींना परीक्षेस सोडण्यासाठी सोबत एका व्यक्तीस सूट राहणार आहे.
सदर परीक्षेदरम्यान उमेदवाराने गैरप्रकार केल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी दिला आहे.