लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महसूल विभागाच्या ई-फेरफार प्रणालीमध्ये राज्यात तिसऱ्या स्थानी आलेल्या जळगाव जिल्ह्यातच ऑनलाईन प्रणालीचे सर्व्हर डाऊन झाले असून जो पर्यंत सर्व्हर सुरु होत नाही व त्याला गती येत नाही तोपर्यंत ऑनलाईन काम न करण्याचा निर्णय तलाठी संघाने घेतला आहे. त्यानुसार जळगाव तालुका तलाठी संघाने डिजिटल सिग्नीचर सिस्टीम (डीएससी) तहसीलदारांकडे जमा केले आहे. ऐन पिक पेऱ्याची नोंदणी हवी असताना शेतकऱ्यांना सातबारा मिळत नसून नोंदीदेखील खोळंबल्या आहेत.
महसूल विभागाचे कामकाज डिजिटल करीत असताना सातबाराही डिजिटल देण्यासाठी सर्व तलाठी कार्यालयात यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. मात्र गेल्या महिन्याभरापासून सर्व्हरची गती अत्यंत कमी झाली आहे. चार ते पाच दिवसांपासून ते सुरुच झाले नाही. यामुळे तलाठी वर्ग चांगलाच वैतागला आहे. अगोदर गती कमी होती म्हणून रात्रीतून सातबारा उतारा काढून ठेवला जात होता. आता तर सर्व्हर चालतच नसल्याने काय करावे, असा प्रश्न तलाठी बांधवांसमोर उभा राहिला. त्यामुळे जळगाव तालुका तलाठी संघाने तालुक्यातील ३३ डिजिटल सिग्नीचर सिस्टीम शुक्रवारी तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे जमा केल्या. जोपर्यंत सर्व्हर सुरळीत सुरु होत नाही तोपर्यंत ऑललाईन कामकाज करायचे नाही असा इशाराही तलाठी संघातर्फे देण्यात आला आहे. ३ मार्च रोजीदेखील सर्व्हरच्या समस्येविषयी तक्रार करण्यात आली होती. मात्र त्याचा उपयोग झाला नाही. त्यामुळे ५ रोजी डीएससी सील करून जमा करण्यात आल्या.
या वेळी तालुका तलाठी संघाचे अध्यक्ष एस.आर. नेरकर, कार्याध्यक्ष एम.बी. सोनवणे, उपाध्यक्ष आर.पी. अहिरे, सचिव एस.एस. पाटील, जिल्हा प्रतिनिधी रुपेश ठाकूर, संदीप डोभाळ यांच्यासह तलाठी बांधव उपस्थित होते.
शेतकऱ्यांचे कामे खोळंबली
सर्व्हर चालत नसल्याने याचा शेतकऱ्यांसह मिळकतदार व इतरांनाही फटका बसत आहे. सर्व्हरअभावी सातबारा काढता येत नसून नोंदीदेखील करणे थांबले आहे. विशेष म्हणजे सध्या शेतकऱ्यांना ज्वारीचा पेरा लावून हवा असताना पिकपेरादेखील लावता येत नसल्याचे चित्र आहे.
स्वतंत्र सर्व्हर हवे
या प्रक्रियेसाठी जळगाव व नाशिक मिळून एक सर्व्हर आहे. त्यामुळे अधिकच ताण येत असतो. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र सर्व्हर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे ई फेरफार नोंदीमध्ये नाशिक विभागातील पाचही जिल्हे अव्वल व जळगाव तिसऱ्या स्थानी असताना सर्व्हरची समस्या मार्गी लागत नसल्याचे चित्र आहे.