जी.टी. टाककळमसरे, ता.अमळनेर : शेतमजूर म्हणून पतीच्या खाद्यांला खांदा लावत शेतात राबताना लहान-लहान दोन मुले व एका मुलीला खूप शिकवून त्यांना मोठ्या हुद्यावर नोकरीस लावण्याचे मोठ्या कौतुकाने पतीजवळ ती सतत बोलायची. पतीही मग तेवढ्याच आनंदात अधिक राबू लागला. पण काळाला ते मान्य नसावे. शेतात काम करता करताच अचानक पतीचे दोन्ही डोळे गेले. कर्ज काढून खूप उपचार केले, पण अखेर पतीची दृष्टी कायमची गेली. दोन्ही डोळ्यांना कायमचे अंधत्व आले.ही व्यथा आहे कळमसरे येथील साहेबराव वामन बडगुजर आणि शोभा बडगुजर या दाम्पत्याची! शोभाबाईने कंबर कसली. पतीला दोन्ही डोळ्यांनी दिसेनासे झाल्याने घरीच खाटेवर आरामाची सोय करून दिली. मजुरांच्या गटात सामील झाली. पुढे मजुरांचीच मुकादम बनली. ज्वारी, बाजरी कापण्यापासून शेतीची सर्वच कामे मक्तेदारी स्वरूपात घेऊन उदरनिर्वाह करू लागली. पतीला बाहेर शौचाला घेऊन जाणे, आंघोळ घालणे, हाताने जेवू घालणे अशा सेवेबरोबरच मुलांच्या शिक्षणाकडेही लक्ष पुरविले. मुलांना विविध व्यवसायाचे शिक्षण दिले. दोन्ही मुले नरेंद्र व उमेश गुजरातमध्ये मोठ्या कंपनीत आहेत. मुलीलाही चांगले स्थळ मिळवून दिले. शरीराने अजूनही धडधाकड असलेल्या शोभाबाई पतीची मनोभावे सेवा करून मिळेल ते काम करण्याची तयारी ठेवतात.
दृष्टीहीन पतीची सेवा बजावत मुलांना लावले नोकरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:21 AM