जळगाव - शहरातील सराफ बाजार, दाणा बाजार, शिवाजी मार्ग, घाणेकर चौक, चौबे शाळा परिसर, पोलन पेठ, नवीपेठ, इत्यादी भाग हा बाजारपट्ट्याचा असून या मार्गावर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या परिसरातील रस्ते, इत्यादी झाडून स्वच्छ करण्याचे काम परिणामकारकरीत्या होऊ शकत नाही. ही कामे करताना मोठ्या प्रमाणावर अडथळे येत असतात. शहराच्या मध्यवर्ती भागांतील या बाजारपट्ट्यातील स्वच्छतेचे काम हे रात्रपाळी करण्यात यावे, अशा सूचना उपमहापौर सुनील खडके यांनी महापालिकेच्या प्रशासनाला दिल्या आहेत.
महापालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती करावी
जळगाव - महापालिकेतील आरोग्य विभागाएवढाच महत्त्वाचा विभाग असलेल्या अग्निशमन विभागात मनुष्यबळाचा तुटवडा आहे. एकच फायरमन व १८ वाहनचालक आहेत. त्यामुळे आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास मोठी हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायरमनसह आवश्यक पदे तातडीने कंत्राटी पद्धतीने भरण्याची मागणी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी आयुक्तांकडे केली आहे. आगीची अथवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचे निवारण करण्यास विलंब होऊन जीवितहानीही होऊ शकते. त्यामुळे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने भरती करावी, अशी मागणी नगरसेवक नाईक यांनी केली आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन
जळगाव - जिल्ह्यातील मुस्लिम, पटेल, देशमुख व देशपांडे बिरादरीच्या समाजबांधवांतर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन १८ फेब्रुवारी रोजी पाचोरा येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर हे राहणार आहेत. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
तापमानात एकाच दिवशी चार अंशांची घट
जळगाव - शहरात गेल्या आठवडाभरापासून ढगाळ वातावरण कायम असल्याने थंडी गायब झाली होती. मात्र, बुधवारी शहरात पुन्हा थंडीचे आगमन झाले असून, किमान तापमानात एकाच दिवसात तब्बल चार अंशांची घट झाली आहे. मंगळवारी (दि. १२) १९ अंश असलेला पारा बुधवारी १५ अंशांपर्यंत खाली आला होता. तापमानात घट होण्यासोबतच दिवसभर शहरात १७ किलोमीटर वेगाने वारे वाहत असल्याने दिवसाही गारवा जाणवत होता.
महापालिकेकडून अतिक्रमण कारवाई
जळगाव - महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून बुधवारी गणेश कॉलनी चौक रस्त्यावरील अनधिकृत हॉकर्सवर जोरदार कारवाई करण्यात आली. यामध्ये १८ हॉकर्सचा माल जप्त करण्यात आला. यावेळी हॉकर्स व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये किरकोळ वादही झाला. यासह सुभाष चौक, बळिराम पेठ भागातही महापालिकेकडून नियमित कारवाई करण्यात आली. दरम्यान, फुले मार्केटमध्ये पुन्हा अनधिकृत हॉकर्सनी दुकाने थाटली असून, या ठिकाणी कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.