श्यामकांत सराफ
पाचोरा : शासनाने नागरिकांची कामे एकाच छताखाली सुरळीत व्हावी म्हणून सेतू सुविधा केंद्रांची निर्मिती केली, मात्र पाचोरा तहसील कार्यालयाचे सेतू सुविधा केंद्र गेल्या वर्षभरापासून बंदच असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. सेतू सुविधा सुरू करण्यासाठी प्रशासनाची अनास्था दिसत असून, तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
सेतू सुविधा केंद्राची संकल्पना
जनतेची तारांबळ, हेळसांड थांबावी म्हणून १० वर्षांपूर्वी शासनाने एक खिडकी योजना सुरू केली. त्याचे सेतू सुविधा केंद्रात रूपांतर झाले. प्रत्येक तहसील कार्यालयात हे केंद्र सुरू झाले. मोठ्या गावांना ‘महा ई-सेवा केंद्र’ ऑनलाइन सुरू झाले. मात्र ६० टक्के कामे तहसील कार्यालयात येऊनच करावी लागतात. यासाठी तहसील आवारातच सुविधा केंद्र सुरू केले आहे. मात्र पाचोरा येथील सेतू केंद्र बंदच असून, याकडे राजकीय मंडळीसह प्रशासनही गप्प आहे.
सुविधा केंद्राचा लाभ
नागरिकांची कामे सुरळीत होऊन दिलेल्या मुदतीत प्रकरणांचा निपटारा करणे, आवश्यक कालावधीत जातीचे दाखले, उत्पन्नांचे दाखले, शालेय कामकाजाचे विद्यार्थ्यांचे दाखले, नकला, तक्रारी, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, निराधारांची प्रकरणे आदी कामे एकाच ठिकाणी दाखल करून विहित मुदतीत नागरिकांना देणे बंधनकारक करण्यात आले होते व ते मिळत होते. त्याच ठिकाणी प्रतिज्ञापत्र करणे सोयीचे होते. मात्र येथील सुविधा केंद्र बंद असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. यामुळे शासनाचा महसूलदेखील बुडत असून, अनधिकृत कामे करणाऱ्यांना चांगलेच लाभदायक झाले आहे.
प्रशासनाची अनास्था
वर्षभरापासून सुविधा केंद्र बंदच असून, यासाठी प्रशासनाने कोणतीही हालचाल केलेली दिसत नाही. हे सुविधा केंद्र बंद ठेवण्यामागील स्वारस्य काय, हा प्रश्न निर्माण झाला आहे. सुविधा केंद्राची इमारत असताना स्थानिक पातळीवर प्रशासनाने निर्णय घ्यावा व हे सेतू सुविधा केंद्र सुरू करावे, अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे.
सुविधा केंद्र बंद, नागरिक त्रस्त
येथील सेतू सुविधा केंद्र बंद असल्याने नागरिकांना तहसील कचेरीच्या कामासाठी विविध टेबलांवर खेट्या घालाव्या लागत आहेत. संबंधित टेबलवरील कारकून बंदच आहे, नवीन ठेका देण्यासाठी जिल्हास्तरावरून कार्यवाही होईल, असे सांगितले जाते.
शासनाने जनतेच्या सोयीसाठी तहसील आवारातच सुविधा केंद्र दिले होते, मात्र वर्षभरापासून बंदच आहे. नागरिकांची हेळसांड होत आहे. तोंडी तक्रारी करूनही अद्याप सुरू होत नाही. सेतू केंद्र तहसील परिसरातच पूर्ववत सुरू करावे.
- रामकृष्ण आनंदा पाटील, नागरिक, रा.पहाण, ता. पाचोरा
सेतू केंद्रामुळे नागरिकांची कामे तहसील परिसरातच तत्काळ होतात. वर्षभरापासून येथील केंद्र बंद असल्याने नागरिकांना भटकावे लागत आहे. त्यामुळे तहसील आवारातील सेतू केंद्र पूर्ववत सुरू करावे.
- हमीद खान, अध्यक्ष, स्टॅम्प वेंडर संघटना, पाचोरा