भुसावळ : येथील रेल्वे याडार्तून मेल लाईनवर खंडव्याकडे जाण्यासाठी निघालेल्या ४५ डब्यांच्या मालगाडीचे ७ डबे मेन लाईनवर घसरल्याने सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प झाली. ही घटना १५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारस घडली.खंडव्याकडे जाणारी ही रिकामी ४५ डब्याची मालगाडी खंबा क्रमांक ४४६/१७ ते २४ यादरम्यान नागपूर दिल्ली या मेल लाईनवर असताना रुळास तडा गेलेला असल्याने ७ डबे रुळावरुन घसरले. याचा परिणाम प्रवासी गाड्यांवर झाला.गाडी क्रमांक-२२१२९ पुणे- अजनी हमसफर एक्सप्रेस, ११०५७ मुंबई- अमृतसर पठाणकोट एक्सप्रेस १२१४१ मुंबई -पाटलीपुत्र एक्सप्रेस, १२८११ लोकमान्य टिळक- हटिया, ११०३९ कोल्हापूर -गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस, १२६५६ चेन्नई- अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस, १२७८० हजरत निजामुद्दीन- वास्को गोवा एक्सप्रेस, १३१४२ पाटलीपुत्र -मुंबई एक्सप्रेस व भुसावळ रेल्वे स्थानकावरून जाणारी भुसावळ -बडनेरा मेमू या गाड्यांवर मालगाडीचे डबे घसरल्याचा परिणाम दिसून आला.यामुळे सुमारे दोन ते तीन तासापर्यंत प्रवासी गाड्या भुसावळ रेल्वे स्थानकावर तसेच जळगाव, रावेर या रेल्वे स्थानकावर थांबून होत्या.दरम्यान ९:४५ च्या सुमारास अपलाईन वरून प्रवासी गाड्यांची वाहतूक सुरळीत करण्यात संबंधित कर्मचाऱ्यांना यश आले. वाहतूक सुरळीत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची उच्चपदस्थ टीम घटनास्थळी तळ ठोकून होती.
मालगाडीचे सात डबे घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 10:52 PM