पाचोरा, जि.जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत संचालक अपात्रतेच्या कारणाने राजकीय स्थित्यंंतर घडणार असून, गेली साडेतीन वर्षे असलेली शिवसेनेची एकहाती सत्ता संपुष्टात येऊन भाजपा-राष्ट्रवादी गटाची सत्ता प्रस्थापित होण्याची चिन्हे दिसत आहे. सभापतीपदी भाजपाचे सतीश शिंदे यांचीच वर्णी लागण्याची शक्यता आहे.याबाबत माहिती अशी की, पाचोरा-भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ संचालक थेट निवडणुकीद्वारे ग्रामपंचायत, विकास सोसायटी, व्यापारी व हमाल मापाडी या मतदारसंघातील विद्यमान सदस्य असलेले उमेदवार निवडून आले. यात शिवसेनेचे १०, तर विरोधी आघाडीत भाजपवचे पाच व राष्ट्रवादीचे तीन असे आठ सदस्य संचालक आहेत. यामुळे १० विरुद्ध आठ असे बलाबल होते. मात्र भाजपाचे सतीश शिंदे व राष्ट्रवादीचे विश्वासराव भोसले यांनी जिल्हा उपनिबंधक व सरकारकडे शिवसेनेच्या संचालकांविरुद्ध अपात्रतेसाठी वेगवेगळे दावे, तक्रारी दाखल केल्या. त्यानुसार विद्यमान सभापती उद्धव मराठे हे सोसायटी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र सध्या ते विकास सोसायटीमध्ये संचलक नाहीत. तसेच वसंत झिपरू वाघ हेदेखील ग्रामपंचातत मतदारसंघातून निवडून आले होते. तसेच विश्वास वामन पाटील, विकास पंडित पाटील हेदेखील विकास सोसायटी व ग्रामपंचायतमध्ये निवडून आले नाहीत. त्यामुळे त्यांच्या संचालक पदावर कुºहाड आली व ते अपात्र घोषित झाले. तसेच प्रताप हरी पाटील, पंढरी गोविंदा पाटील, मंगेश सुमेरसिंग पाटील ह्या संचालकांनी मागील काळातील गैरव्यवहारतील जबाबदारी निश्चित केलेली रक्कम बाजार समितीत न भरल्याने तेदेखील अपात्र ठरल्याने त्यांचे संचालकपद रद्दबातल ठरले. यामुळे सत्ताधारी शिवसेनेचे दहापैकी सात संचालक अपात्र ठरल्याने भाजपाने संधीचा फायदा उठवत मर्जीतील दोन संचालक जागा बहुमताने भरून घेत मान्यता मिळवली. यामुळे बाजार समितीत आता भाजपाचे सात, राष्ट्रवादीचे तीन अशी १० सदस्यसंख्या असल्याने व विद्यमान सभापती शिवसेनेचे उद्धव मराठे अपात्र होऊन पायउतार झाले. यामुळे जिल्हा उपनिबंधकांनी सभापती निवडीची प्रक्रिया सुरू केली. मात्र यावर उद्धव मराठे यांना मे खंडपीठाचा तात्पुरता स्टे मिळाला असला तरीही सभापती निवडीची प्रक्रिया ५ आॅगस्टनंतर निश्चित झाली आहे.बहुमताच्या जोरावर सभापतीपदी सतीश शिंदे यांची वर्णी?दरम्यान, शिंदे गटाने दोन संचालकपदे अगोदरच मागच्या दाराने भरून घेतल्याने भाजपा गटाकडे संचालक १० झाले आहे. यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश शिंदे यांचीच वर्णी लागणार हे निश्चित मानले जात आहे.
सत्ताधारी शिवसेनेचे सात संचालक अपात्रतेनंतर अल्पमतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:32 PM