लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील रणाईचे येथे मोठे बाबांच्या महानुभाव आश्रमात ७जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत आणि त्यांच्यासह १८ जणांना कोरोनाचे लक्षणे आढळल्याने सर्वाना वेगवेगळ्या ठिकाणी आयसोलेट करण्यात आले असून आश्रमात दर्शनाला बंदी घालण्यात आली आहे.
तालुक्यातील रणाईचे येथे महानुभाव आश्रम असून त्याठिकाणी श्रीकृष्णाची मूर्ती आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून महानुभाव पंथाचे दर्शनासाठी भाविक व संत येत असतात. याठिकाणी काही लोकांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळून आल्याने जानव्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. संजय रनाळकर व त्यांच्या पथकाने काही लोकांची रॅपिड अँटीजन चाचणी केली असता ७ जण पॉझिटिव्ह आले आहेत आणि काही लोकांची अँटीजन चाचणी संशयास्पद आली. म्हणून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश गोसावी यांनी आश्रमातील सर्व ६७ लोकांची आरटीपीसीआर चाचणी करून घेतली असून त्याचा अहवाल प्रतिक्षेत आहे. तसेच गावातील प्रतिष्टित व्यक्तीच्या कुटुंबात विवाह झाल्याने गर्दी झाली होती. म्हणून प्रशासनाने काळजी म्हणून महानुभव आश्रमात दर्शनासाठी तूर्त बंदी घातली असून योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
कोविडचा प्रादुर्भाव वाढतोय
दरम्यान तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. विद्यार्थ्यांची चाचणी होत नसल्याने त्यांच्याकडून शिक्षकांना लागण होण्याची शक्यता बळावली आहे. काही शिक्षक व कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत. मात्र ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर नसल्याने रुग्णांना चोपडा येथे किंवा जिल्हा रुग्णालयात रवाना केले जात असल्याने रुग्ण नकार देतात व खाजगी रुग्णालयात उपचार घेतात. तेथे त्याना जास्त पैसे मोजावे लागत असल्याने कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.