जळगाव : जिल्ह्याला गेल्या दोन वर्षांत पीएम केअर फंडातून ग्रामीण भागाला ६० आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला सुमारे शंभरच्या आसपास व्हेंटिलेटर प्राप्त झाले आहेत. यातील ग्रामीण रुग्णालयातील ७ ते ८ व्हेंटिलेटर तांत्रिक कारणास्तव बंद आहेत. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला दोन आठवड्यांपूर्वी पन्नास व्हेंटिलेटर प्राप्त झाले होते. त्यांची चाचणी यशस्वी झाली.
जिल्हाभरात गेल्या वर्षी कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात व्हेंटिलेटरचा प्रचंड अभाव होता. त्यामुळे अनेक रुग्णांना व्हेंटिलेटर मिळत नसल्याने त्यांची फिरफिर झाली होती. अनेकांना वेळेवर उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अर्थात आधीच्या जिल्हा रुग्णालयात वर्षानुवर्षे केवळ सहा व्हेंटिलेटरवर एक आपत्कालीन कक्ष सुरू होता. मात्र कोरोनाच्या काळात टप्प्याटप्प्याने व अन्य शासकीय यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेटर उपलब्ध झाले. साधारण शंभरच्या आसपास व्हेंटिलेटर विविध माध्यमांतून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाला प्राप्त झाले होते. यात पीएम केअर फंडातून आलेल्या व्हेंटिलेटरचाही समावेश होता. मात्र, बरेच दिवस कनेक्टर अभावी एका खोलीत ते बंद अवस्थेत होते. त्यानंतर काही दिवसांनी ते सुरू करण्यात आले होते.
व्हेंटिलेटर कक्षात हलविले
पीएम केअर फंडातून सुरुवातीला १० व त्यानंतर ४० असे एकूण ५० व्हेंटिलेटर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला प्राप्त झाले होते. त्यातील सुरुवातीला १० व्हेंटिलेटरचे इंस्टॉलेशन व डेमो घेण्यात आला. ते विविध कक्षांत लावण्यात आल्यानंतर ४० व्हेंटिलेटरचे इंस्टॉलेशन झाल्यानंतर नुकतेच ते विविध कक्षांमध्ये पाठविण्यात आले आहेत. हे व्हेंटिलेटर सुस्थितीत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
असे आले आहेत व्हेंटिलेटर
ग्रामीण रुग्णालय ६०
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ५०
बंदवस्थेत ग्रामीण रुग्णालयातील ८
येथील व्हेंटिलेटर बंद
न्हावी येथील ग्रामीण रुग्णालय व रावेर येथील रुग्णालयातील सात ते आठ व्हेंटिलेटर तांत्रिक कारणास्तव, तसेच डेमोच्या वेळी बंद पडले होते. तेव्हापासून ते बंद आहेत. याबाबत वरिष्ठ पातळीवर कळविण्यात आले आहे. बराच वेळा न्हावी येथे गंभीर अवस्थेत रुग्ण हलविल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडत असल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात येते.
आधीपेक्षा परिस्थितीत सुधारणा
कोरोनाच्या आधीच्या काळात ग्रामीण यंत्रणेत व्हेंटिलेटरची व्यवस्था नव्हती, मात्र आता प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात एक किंवा दोन व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याने गंभीर रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार मिळत आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील भार कमी झाला आहे. शिवाय यामुळे मृत्युदर घटल्याची माहिती आहे.
व्हेंटिलेटर समिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात व्हेंटिलेटरबाबतच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच व्हेंटिलेटरची उपलब्धता व कोणत्या रुग्णाला व्हेंटिलेटर लागणार आहे, याची चाचपणी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. डॉ. जितेंद्र सुरवाडे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पुढाकार घेऊन ही समिती स्थापन केली असून, यामुळे व्हेंटिलेटरच्या वापराबाबत सुटसुटीतपणा आला आहे. ही समिती दररोज सायंकाळी डॉक्टरांना अहवाल देत असते.