जळगाव- विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी प्रशासनासोबतच भगीरथ विद्यालयाची सात वर्षीय विद्यार्थिनी वेदीका दारकुंडे ही मतदार राजांना प्रत्यक्ष भेटून मतदान जनजागृतीसाठी सरसावली आहे.विधानसभा निवडणुकीचा प्रवास हा आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करित आहे. एकीकडे उमेदवारांची लगीनघाई तर दुसरीकडे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी शहरातील नाक्या-नाक्यावर लोककलेसह विविध माध्यमातून मतदार जनजागृती केली जात आहे. एवढेच नव्हे तर शहरातील भगीरथ शाळेची सात वर्षीय विद्यार्थिनी वेदीका दारकुंडे ही स्वत: मतदारांच्या घरी जावून मतदानाचे महत्व सांगून जागृती करित आहे. सोबत तिने मतदान जनजागृतीचे पोस्टरचा ड्रेस परिधान केला आहे़ शनिवारी तर तिने जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षेला भेट दिली. त्याठिकाणी उपस्थित असलेले उपजिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा कोषागार अधिकारी प्रवीण पंडीत, किशोर वायकोळे, डॉ़ मिलिंद बागुल आदींची भेट घेवून मतदाना करण्याचे तिने सांगितले. याप्रसंगी तिचे वडील प्रदीप दारकुंडे व आई मंगला यांचीही उपस्थिती होती. ती पालकांसोबत रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना देखील भेट घेवून मतदानासाठी आवाहन करताना दिसून आली़ चिमुकल्या वयात देशाच्या प्रगतीसाठी तिने जनजागृतीसाठी उचलेले पाऊल पाहून सर्वस्तरातून तिचे कौतूक केले जात आहे.
सात वर्षीय ‘वेदीका’ करतेय मतदान जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 9:37 PM