ऑनलाईन लोकमत
चाळीसगाव, जि. जळगाव, दि. 10 - चाळीसगाव बाजार समितीत गेल्या 20 ते 25 दिवसांपासून अत्यल्प प्रमाणात यंदाच्या खरीप हंगामातील उडीद आणि मुगाची आवक होत आहे. बेहोनीलाच उडीद-मुगाला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळत असला तरी शेतक:यांना सतराशे रुपयांचा फटका बसतोयं. उडीद-मुगाचा एकरी उत्पन्न खर्च 6700 रुपये असून एवढय़ाच क्षेत्रात क्विंटल ते दीड क्विंटल उत्पन्न मिळते. उत्पादक शेतक:यांमध्ये भाव मिळत नसल्याने नाराजी आहे. कांद्याची आवाक वाढली असली तरी दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असे त्याचेही दर वधारले आहे. चाळीसगाव बाजार समितीत शेजारच्या नांदगाव, कन्नड या परजिल्ह्यातील तालुक्यामधुनही कृषिमाल शेतकरी विक्रिसाठी आणतात. पोळ्यानंतर उडीद आणि मुगाची आवक सुरु होते. यंदाही ती वेळेवरच सुरु झाली. मात्र पावसाच्या दांडीयात्रेने उत्पादनावर परिणाम झाल्याचे शेतक-यांनी सांगितले. पाच हजाराचे भाव सुरुवातच असल्याने बाजार समितीत उडीद, मुगाची आवक अत्यल्प असून गेल्या 25 दिवसात मुगाला 4 हजार 800 ते पाच हजार आणि उडीदाला 4 हजार 600 ते पाच हजार प्रतिक्विंटल असे भाव मिळाले आहे. आवक वाढल्यानंतर दरामध्ये आणखी तेजी येईल, असे आडत व्यापारी दत्तात्रय बाबुलाल वाणी यांनी सांगितले. कांदाही दोन हजारी गेल्या वर्षी पहिल्यांदाच बाजार समितीचे सभापती रविंद्र चुडामण पाटील यांनी कांदा खरेदी सुरु केली. यामुळे नाशिक जिल्ह्यातील कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीस येत आहे. चाळीसगाव तालुक्यातील उत्पादीत कांद्याला स्थानिक बाजार समितीत विकता येत असल्याने शेतक-यांच्या वाहतुक खर्चात मोठी बचत झाली. आठवड्यातून चार दिवस बाजार समितीत कांदा खरेदी केली जाते. रविवारी बाजार समितीत शंभर ट्रॅक्टर कांद्याची आवक झाली. प्रति क्विंटल दोन हजार अशा दराने लिलाव झाले. कांदा खरेदी मार्केट सुरु केल्याने बाजार समितीच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे सभापती पाटील यांनी सांगितले.