लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर: मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर गावाजवळ गतीरोधकावर कंटेनर हळू करत असताना मागून भरधाव वेगाने येणारा केमिकल्सने भरलेला टँकरने धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, टँकर काही क्षणातच उलटला आणि पेट घेतला. तसेच दुसऱ्या वाहनानेही देखील पेट घेतला. त्यामुळे टँकरमधील चालकाला बाहेर न पडता आल्यामुळे त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर कंटनेरमधील चालक-सहचालक या घटनेत थोडक्यात वाचले.
मंगळवार, १ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास महामार्गावरील पळासनेर गावाजवळील चारणवाड्यासमोर ही घटना घडली. याठिकाणी मोठमोठे गतीरोधक करण्यात आले आहेत. सेंधवाकडून ट्रॅक्टर भरलेला कंटनेर चालकाने शिरपूरकडे येत असताना गतीरोधकांवर येण्यापूर्वी गाडी हळू केली. त्याचवेळी पाठी मागून भरधाव वेगाने येणारा केमिकल्सने भरलेल्या टँकरने कंटनेरला जोरदार धडक दिली. धडक एवढी मोठी होती की, या धडकेत टँकर काही क्षणातच उलटला. केमिकल्स रस्त्यावर पडले. त्याचक्षणी टँकरने पेट घेतला. त्यामुळे टँकरमधील चालक व सहचालकांना बाहेर पडता आले नाही. तोपर्यंत आगीने रौद्ररूपधारण केल्यामुळे त्यांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सुर्दैवाने कंटनेरमधील चालक व सहचालक बालबाल बचावले. रात्री उशिरापर्यंत टँकरमधील चालक व सहचालकांची ओळख पटू शकली नाही.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पळासनेर गावात पसरताच अनेकांनी घटनास्थळी गर्दी केली. मात्र, टँकर केमिकल्सचा असल्यामुळे जवळपास कुणीही जात नव्हते. कदाचित टँकरचा स्फोट होईल, या भीतीने दुसऱ्या रस्त्यावरील रहदारी काही वेळाकरीता थांबवण्यात आली. काहीवेळानंतर केमिकल टँकरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिक प्रचंड घाबरले. तब्बल एका तासानंतर अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन आग आटोक्यात आणली. आगीचा लोंढा एवढा मोठ्या प्रमाणात होता की, काही वेळाकरिता परिसरात काळ्या रंगाचा धूरच दिसत होता. या आगीमुळे ३ ते ४ तास मुंबई-आग्रा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. अपघातानंतर तात्काळ सांगवी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, पोलीस उपनिरीक्षक भिकाजी पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्याकाळी महामार्ग ठप्प होऊन दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली होती. ४ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर वाहतूक सुरू करण्यात आली.