२४ सीटीआर ३०
मनपाचे दुर्लक्ष : जैवविविधता आणि जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही वर्षांपासून परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी या तलावात सोडण्यात येत असल्यामुळे, तलावात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण वाढत आहे. असाच प्रकार अजून काही वर्ष सुरू राहिला तर, तलावाची गटार गंगा होण्यास वेळ लागणार नाही. या तलाव परिसरातील जैवविविधता आणि तलावातील जलचर प्राण्यांचे अस्तित्व यामुळे धोक्यात आल्याचे रविवारी 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून समोर आले. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारे तलावाचे प्रदूषण होत असताना मनपा प्रशासनासह लोकप्रतिनिधी यांचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.
शहराचे वैभव असलेल्या मेहरूण तलावाच्या संवर्धनासाठी, पर्यावरण प्रेमींकडून विविध प्रश्नांवर आवाज उठविण्यात येत आहे. तलाव परिसरातील वाढत्या वृक्ष तोडीचे प्रमाण, गुरांचा तलाव परिसरात मुक्त संचार, तलावात कपडे व वाहने धुणे, अतिक्रमणामुळे तलावाचे जलस्त्रोत आटने, त्यामुळे तलाव अपूर्ण भरणे, तसेच मुख्य म्हणजे सांडपाणी सोडल्यामुळे तलावाचे अस्तित्व नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. तलावाच्या परिसरातील मोठ्या प्रमाणावर असलेल्या नागरी वसाहतींचे सांडपाणी थेट तलावात सोडल्यामुळे तलावातील पाणी दूषित होऊन दुर्गंधीही येत आहे.
इन्फो :
दररोज लाखो लीटर सांड पाणी सोडले जाते तलावात
'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीत मेहरुण तलावात तीन ठिकाणी मोठ-मोठ्या आकाराचे पाईप टाकून सांडपाणी सोडण्यात येत असल्याचे दिसून आले. पावसाळ्या प्रमाणे या पाईपातून सांडपाण्याचा प्रवाह वाहतांना दिसून आला. त्यामुळे दररोज मेहरुण तलावात लाखो लीटर सांड पाणी सोडले जात आहे. तलावात काढण्यात आलेल्या पाईपाच्या ठिकाणी सतत पाणी वाहत असल्यामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झालेला दिसून आला. त्यात पाळीव प्राणी बसत असल्यामुळे अधिकच दुर्गंधी पसरलेली दिसून आली.
इन्फो :
तर भविष्यात तलावाचे अस्तित्व नष्ट होणार
तलावात गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील नागरी वसाहतींचे सांडपाणी सोडण्यात येत आहे. यामुळे मोठा दूषित पाण्याचा स्तर तलावात जमा होत आहे. तसेच दुसरीकडे तलावातील पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. या दूषित पाण्यामुळे तलावात असणारे विविध प्रकारचे जलचर प्राणी मृत पडत आहे. काही वर्षांपूर्वीही तलावात मासे मृत पडत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सध्या तलावात असलेल्या एकूण साठ्या पैकी निम्मा साठा हा सांड पाण्यामुळे दूषित झाला आहे. दिवसेंदिवस तलावात दूषित पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे भविष्यात मेहरुण तलावाचे अस्तित्व नष्ट होऊन तलावात गटार गंगा झाल्या सारखी परिस्थिती निर्माण झाली असेल, अशी भीती पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे.
इन्फो :
या सांड पाण्यामुळे तलावात मासे मृत पडल्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. सांड पाण्यामुळे तलावातील जलचर वनस्पती आहेत, त्या दुषित होत आहेत. या दूषित वनस्पती खाल्यामुळे विविध प्रकारच्या पक्ष्यांवर परिणाम होत असल्याने या पक्षांनी आता तलावाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी हे सांडपाणी बंद केले पाहिजे.
राजेंद्र गाडगीळ, पर्यावरण प्रेमी
तलावात गेल्या काही वर्षात सांड पाण्यामुळे तेथील जलचर प्राणी मृत पडत आहेत. वनस्पती नष्ट होत आहेत. तसेच पाणी दूषित होत असल्याने गटार गंगाची परिस्थिती निर्माण होत आहे. जळगावचे वैभव म्हणणाऱ्या या तलावाकडे मनपा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात तलावाचे अस्तित्व नष्ट होण्यास वेळ लागणार नाही.
सुजाता देशपांडे, पर्यावरण प्रेमी