शाहीर शिवाजीरावांनी पारंपरिक कलांचा वारसा न तोडता वर्तमान समस्यांची नाळ समाजाशी जोडली़ म्हणून जलसंधारण कार्यक्रम असो स्त्रीभ्रूण हत्या कार्यक्रम असो किंवा मतदार जागृती अभियान यासारखे नव्याने आलेले विषयही त्यांनी शाहिरी कलेतून लिलया पेललेत़ जनमानसाचा अचूक ठाव घेणारी त्यांची सूक्ष्म निरीक्षण शक्ती व अभ्यासपूर्ण लेखन शाहिरी कलेला एक उंचीवर घेऊन जाते़ खांदेश महोत्सवात लिहिलेला व सादर केलेला महाराष्ट्राचा पोवाडा तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनासुद्धा प्रभावित करून गेला़ त्यातील आशय व शद्धसांैदर्य विद्वानांना मान डोलायला लावते़ बदलत्या काळाची पावले ओळखत शाहिरांनी आपल्या लिखाणाची दिशा बदलली़ परंतु पारंपरिक शाहिरीला धक्का लागू दिला नाही़महाराष्ट्र शाहीर परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शाहीर योगेश यांच्या काळात नगरदेवळे नगरीत राज्यस्तरीय तीन दिवसीय शाहिरी अधिवेशनाचे यशस्वी आयोजन त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने करून दाखवले़ या कार्यक्रमासाठी कोल्हापूर, सांगलीपासून बुलढाणा, अमरावतीपर्यंतच्या शाहिरांनी आवर्जुन उपस्थिती दिली़ त्यांचे शाहिरी कलेतील योगदान बघता ग्रामपंचायतीने त्यांना कार्यालयासाठी, स्वतंत्र जागा दिली़ आज महाराष्ट्रात शाहिरांचे स्वतंत्र कार्यालय नगरदेवळ्यातच आहे़ शाहिरांनी लोकरंग फाउंडेशन स्थापन करून नवोदित कलावंतांना प्रोत्साहित करत विविध व्यक्तींना ‘खान्देश रत्न’ म्हणून गौरविले़ शाहिरी कला नवीन पिढीत रूजावी, तरुणांनी शाहिरीकडे प्रबोधनासाठी वळावे म्हणून महाराष्ट्र राज्याच्या शाहिरी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन त्यांनी केले़ त्यांनी प्रशिक्षित केलेल्या बालिका व युवा शाहिरांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळया ठिकाणी कार्यक्रम सादर करून पे्रक्षकांची वाहवा मिळवली़शाहीर शिवाजीराव पाटील यांनी ज्याप्रकारे कलानुरूप बदल करत वेगळी वाट शोधली तशी दुर्दैवाने अन्य लोककलावंतांना शोधता आली नाही़ त्यामुळे गोंधळ, वहीगायन कलापथक या कला मर्यादित राहिल्या़ गोंधळ या लोककलेचा वारसा नवीन पिढीला घेता आला नाही. त्यामुळे जुन्या पिढीतील कवनं, हस्तलिखितांचे बाड पारंपरिक वाघे, वाघांचे ताल, सूर, ठेका आज लोप पावले़ परंतु तरीही काही कलावंतांनी ही कला जिवंंत ठेवण्याची धडपड सुरूच ठेवली आहे़ शाहीर बाबूराव मोरे हे स्वत:च्या हिमतीवर हार्मोनियम शिकले. तुणतुणे, ढोलकी, कॅसिनो या वाद्यांवरदेखील त्यांचे प्रभुत्व आहे़ ते स्वत: उत्कृष्ट गायक व सुरांचे जाणकार आहेत़ प्रभाकर सोनवणे हे त्यांच्या साथीला संबळ वाजवतात़गोंधळ वहीगायन व वीरपूजन हे वेगवेगळे कलाप्रकार असले तरी यात संबळ वादनाला महत्व आहे़ आता काही ठिकाणी डफ आणि ढोलकी पण वापरतात. संबळ, डफ, पिपाणी, टाळ या सर्वांच्या ठेक्यावर विशिष्ट पदन्यास लक्ष वेधून घेतो़ संबळच्या ठेक्यासोबत वीरांच्या पायांची गती वादकाला साधावी लागते़ संबळ वादकाला विशिष्ट ठेका आणि वीरांचे पदलालित्य हे बघणाºयालाही स्फूर्ती निर्माण करते़ कुठे द्रूत तर कुठे विलंबित गती कलावंतांना असल्याने वीर वादनाला एक वेगळीच खुमारी चढते़ या नृत्यात वीरांचे रिंगण हा बघण्यासारखा प्रकार असतो़ वादक विशिष्ट टिपेला पोहचतात. त्यात वीरांच्या पायांची चपळ गती पायातील घुंगरांचा व कमरेला बांधलेल्या गेजचा ठेका यामुळे अंगावर रोमांच उभे राहतात़ वीरांसोबत नृत्य करणारा पट्टीचाच असावा लागतो़ आपल्या घरात कलेचा वारसा नसतानादेखील भागवत महाजन व योगेंद्र राउळ या युवकांनी संबळ, ढोलकी, मृदंग या वाघांवर प्रभुत्व मिळविले़ शाहीर राजेंद्र जोशी हे हार्मोनियम, तबला, ढोलकी, ही वाद्ये सफाईदारपणे वाजवतात. त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना तबला शिकवला़ तबला वादनाचे वर्गदेखील ते घेतात़ (क्रमश:)- संजीव बावस्कर, नगरदेवळा, ता.पाचोरा, जि.जळगाव
शाहिरांचे स्वतंत्र कार्यालय नगरदेवळ्यातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 9:16 PM