लोकमत न्यूज नेटवर्क बोदवड : तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जनतेने घराणेशाहीला नाकारल्याचे दिसून आले. यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, तर खडसे समर्थकांनाही हादरे बसले आहेत. तालुक्यात सर्वांच्या नजरा लागून असलेली मनूर बु. येथील निवडणूक यंदा धक्कादायक निकाल देणारी ठरली. मनूरमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांचे पॅनल होते, तर या पॅनलमध्ये त्याचा पुतण्या सम्राट पंजाबराव पाटील हाही उमेदवार होता, तर विरोधात त्यांच्याच भाऊबंदकीत असलेल्या सागर प्रभाकर पाटील यांनी पॅनल उभे केले होते. अटीतटीच्या लढतीत सागर पाटील यांनी पूर्ण फायदा उचलत जिल्हा अध्यक्ष तुम्ही, आमदारकीसाठी तुम्ही, खासदारकी तुम्ही, जिल्हा परिषद तुम्ही व आता ग्रामपंचायतही तुम्हीच, असा प्रचार करत या निवडणुकीत आपली प्रतिष्ठापणाला लावली व यश मिळविले. यात ॲड. रवींद्र पाटील यांच्या पॅनलला अकरा जागांपैकी फक्त एक जागा मिळाली तर प्रतिस्पर्धी सागर पाटील यांच्या पॅनलला नऊ जागा मिळाल्या व एक अपक्ष विजय झाला. तर माजी पंचायत समिती सभापती राहिलेल्या प्रमिला इश्वेर जंगले, माजी पंचायत समितीचे सभापती भरत पाटील यांच्या पत्नी शोभाबाई पाटील, तर विद्यमान पंचायत समिती सदस्य व माजी सभापती गणेश पाटील यांच्या आई विमलबाई सीताराम पाटील यांचाही पराभव झाला. नाडगाव येथे माजी सभापतींची पत्नी पराभूत नाडगाव येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या भाच सून व भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती वीरेंद्रसिंग पाटील यांच्या पत्नी रंजनकुंवर पाटील या ईश्वर चिठ्ठीमुळे पराभूत झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी योगिता श्रीकष्ण लसूणकर यांना ३०२ मते पडल्याने ईश्वर चिठ्ठीने योगिता श्रीकृष्ण लसूणकर या विजयी झाल्या.
बोदवड तालुक्यात प्रस्थापितांना हादरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:39 PM