जळगाव- केंद्रात आपली सत्ता होती, तेव्हा प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद मिळाले होते. ज्या लोकांवर शरद पवार यांनी विश्वास ठेवला ती चूक केली, असा टोला आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना लगावला. राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली, आता राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसत आहे. यामुळे आता दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. आज खासदार शरद पवार यांच्या गटातील आमदार रोहित पवार जळगाल दौऱ्यावर होते, यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली.
'वन नेशन, वन इलेक्शन'! समिती ॲक्शनमोडमध्ये, अधिकाऱ्यांनी रामनाथ कोविंद यांची भेट घेतली
आमदार रोहित पवार म्हणाले, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकूनच मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिले होते. राष्ट्रवादी पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले नसले तरी अनेक मंत्रीपद आपल्याला मिळाली होती.
विदर्भात राष्ट्रवादीच्या जागा वाढाव्या म्हणून ज्या व्यक्तीला शरद पवार यांनी ताकद दिली, तिच लोक कमी पडलीत असं प्रफुल्ल पटेल यांना सांगायच आहे का? असं मला वाटतं. थोड्या दिवसात ते एक पुस्तक लिहिणार आहेत, अशी मला माहिती मिळाली आहे. ते जेव्हा लिहितील तेव्हा काय लिहणार आहे आपण पाहूया. शरद पवार साहेबांनी विश्वास ठेवलेला त्यावर त्यांनी विदर्भात राष्ट्रवादीच्या जागा वाढविल्या की नाही याच काही लिहितीत तेही पाहूया, असंही रोहित पवार म्हणाले.
रोहित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मदत करण्यासाठी इतर पक्ष का लागत आहेत. आता लोकांनाच भाजप नकोसे झाले आहे हेच भाजपला समजल्यामुळे घाबरले आहेत. आता इंडिया आघाडी मजबूत होत आहे. सुरू असलेल्या बैठकामुळे भाजप दहशतीखाली आहे. मुंबईतील इंडियाची बैठक चांगली झाली. या बैठकांना घाबरुनच भाजप लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याबाबत बोलत असल्याचेही रोहित पवार म्हणाले.