जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्वाभीमान सभेच्या माध्यमातून महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यात आज त्यांनी जळगाव येथे आयोजित सभेला संबोधित केले. यावेळी, खान्देशचा इतिहास सांगताना खान्देशी लोकांच्या स्वाभीमानाचं आणि संघर्षाचं कौतुक केलं. त्यानंतर राज्यातील भीषण परिस्थिती सांगत राज्यावर दुष्काळाचं सावट असल्याचं ते म्हणाले. तसेच, राज्यातील शेतकरी अडचणीत आहे, सर्वसामान्य त्रस्त आहे, तर रोजगार नसल्याने युवा वर्गात संताप आहे. मात्र, राज्यात आणि देशाची सुत्रं चुकीच्या लोकांच्या हातात आहेत, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच, पहिल्यांदाच जाहीर सभेतून त्यांनी राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप मोदींवर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतीही फूट नाही, असे शरद पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार गटाविरोधात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे कारवाईसंदर्भात पत्र दिल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, जळगाव येथील सभेतून पहिल्यांदाच त्यांनी राष्ट्रवादी फोडल्याचा आरोप भाजपावर केला आहे. तसेच, मोदींनी भ्रष्ट्राचाराच्या आरोपांची चौकशी का केली नाही, त्यांनी चौकशी करावी, असे आव्हानही त्यांनी मोदींना दिले आहे.
राज्यातील शेतकरी संकटात आहे, शेतीला पाणी नाही, धरणात पाणी नाही. ज्या भाजपावाल्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राची आणि देशाची सुत्रं आहेत, त्यांना शेतकऱ्यांच्या दु:खाबद्दल यत्किंचितही आस्था नाही. चुकीच्या हाताच्या लोकांमध्ये देश आणि राज्य गेलंय. महाराष्ट्र असो किंवा इतर राज्य असो, तरुणांमध्ये बेकारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात १५ दिवसांत २० लोकांनी आत्महत्या केल्या, अशी परिस्थिती आहे. खान्देशाला संघर्षाचा इतिहास आहे.
देशात सध्या मोदीचं राज्य आहे, मोदींनी काय केलं, ९ वर्षे झाली. इतर राजकीय पक्ष फोडणे, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, हे फोडाफोडीचं राजकारण केलं, तेवढी एकच गोष्ट त्यांना येते. दुसऱ्या बाजुने आपल्या हाती असलेल्या सत्तेचा वापर करत ईडी, सीबीआय आणि केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून काही नेत्यांना तुरुगांत टाकलं. खोटे खटले दाखल केले. नवाब मलिक यांना तुरुंगात टाकलं. सत्तेचा गैरवापर भाजपवाल्यांनी केलाय, असे म्हणत शरद पवार यांनी जळगावातील सभेतून मोदी सरकारवर निशाणा साधला.
मोदींनी भोपाळमधून राष्ट्रवादी काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. मग, आमचा त्यांना सवाल आहे, तुम्ही पंतप्रधान आहात. सत्ता तुमच्या हातात आहे. मग, आरोपांची चौकशी करा आणि संबंधितांवर कारवाई करा. नसेल तर तुम्ही कोणती शिक्षा घेणार असा सवालही शरद पवारांनी मोदींना विचारला आहे.