जळगाव -शरद पवार यांच्यासोबत आता कोणीही जायला तयार नाहीत. त्यामुळे शरद पवार जर त्यांच्यासाठी दरवाजे बंद करण्याची गोष्ट करत असतील. त्यांना सल्ला आहे की, त्यांनी त्यांच्या पक्षाचे दरवाजे बंद करून ठेवावेत, कारण त्यांच्या पक्षात आहेत तेवढे देखील आता त्यांना सोडून जात आहेत, अशा शब्दात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
जिल्हा सहकारी दूध संघाच्या सार्वत्रिक वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. या सभेनंतर पत्रकारांशी बोलतांना महाजनांनी शरद पवारांवर टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या गटातून अनेकजण अजित पवारांकडे येत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी इतरांसाठी दरवाजे बंद न करता, जे जाताहेत त्यांना थांबविण्यासाठी दरवाजे बंद करावेत असे महाजन यांनी सांगितले. महाजनांनी इंडिया आघाडीवर देखील टीका केली. इंडीया आघाडीत एकमत नसून, वड्डटीवार हे शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. अद्यापही त्यांचा कोणताही नेता ठरलेला नाही. त्यांचा नेता ठरला की, त्यांची सर्कस देखील बंद पडेल अशा शब्दात असे गिरीश महाजनांनी सांगितले.
एकनाथ खडसेंचे डोके तपासावे लागेल...
जिल्हा दूध संघ ६ कोटींच्या तोट्यात असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला होता. याबाबत बोलताना गिरीश महाजनांनी एकनाथ खडसे यांचे डोके तपासावे लागणार असल्याचे सांगितले. ८ कोटींचा तोटा होता, तो २ कोटींनी कमी केला आहे. ८ कोटींचा तोटा हा खडसेंच्या कार्यकाळातील होता. खडसेंच्या कार्यकाळात काय-काय झाले याबाबत चौकशी सुरु असून, सर्व काही अहवालातून स्पष्ट झाल्याचे गिरीश महाजनांनी सांगितले. तसेच याबाबत येत्या काळात गुन्हे दाखल होणार असल्याचेही महाजन म्हणाले.