जळगाव: राष्ट्रवादीतील ‘पॉवर’ गेमनंतर खासदार शरद पवार रविवार व सोमवार, ९ व १० जुलै असे दोन दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अजित पवार व काही सहकारी आमदार पक्षाच्या हिताविरोधात भूमिका घेत भाजप व शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांना जळगावातूनही साथ मिळाली. या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवारांचा दौरा महत्त्वाचा आहे.
अजित पवार व सहकारी आमदार रविवारी, भाजप व शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. त्यांच्यासोबत जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील हे देखील गेले आहेत. अजित पवार यांच्या खेळीमुळे पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाराष्ट्रात दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. ते रविवार (दि.९) व सोमवार (दि.१०) दोन दिवस जळगाव जिल्ह्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी दिली.
पक्ष संघटनेचा आढावा आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी खासदार शरद पवार दौरा करणार आहेत. यादरम्यान जळगाव शहर, मुक्ताईनगर व अमळनेर आदी तीन ठिकाणी जाहीर सभादेखील होतील. ते नरडाणे येथून अमळनेर, धरणगावमार्गे जळगावला येतील, असे म्हटले जात आहे; परंतु या माहितीला जिल्हाध्यक्षांकडून दुजोरा मिळाला नाही. सविस्तर दौरा निश्चित झाल्यावर त्याची माहिती देऊ, असे त्यांनी म्हटले आहे. मुक्ताईनगरला दि. १० रोजी सभा होणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी दिली. दरम्यान, अजित पवारांच्या गटाला पाठिंबा देत पक्षविरोधात कारवाई केली म्हणून जळगाव जिल्ह्यातील युवकच्या दोन पदाधिकाऱ्यांना सोमवारीच पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे.