जळगाव : शरद पवार यांनी ईव्हीएमवर शंका उपस्थित करणे म्हणजे त्यांना पराभवाची चाहूल लागली आहे़ त्यांनी २०-२२ जागा लढविल्या पण दोन, तीन ठिकाणी विजय होईल त्यावर ते पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात आहेत. पराभवाची कारणे लिहायला त्यांनी सुरूवात केली आहे, अशी बोचरी टीका राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली़महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमानिमित्त बुधवारी चंद्रकांत पाटील हे जळगावी आले होते़ त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते़ ते पूढे म्हणाले, बारामतीमध्ये जर भाजपच्या उमेदवार कांचन कूल या निवडून आल्या तर चुकीचा संदेश जाईल, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले होते. त्यासंदर्भात चंद्रकांत पाटील बोलत होते़देश कायद्याने चालतोते म्हणाले, ईव्हीएम काँग्रेसने आणले़ चार राज्यात काँग्रेसचा विजय झाला़ त्यावेळेस त्यांना ईव्हीएम चालले़ पण भाजपाचा विजय झाला की, ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचे ही मंडळी बोलते. हा देश कायद्याने चालतो़ या देशाचा निवडणूक आयोग स्वायत्त आहे़न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश द्यावा कि ईव्हीएम बंद करावे़ त्यानंतर चिठ्ठया ही कशाला लोकांचे हातवर करून मतदान घ्यावे़ आमचे काहीही म्हणणे नाही़ या देशाची व्यवस्था नाकारणे हा काँग्रेसने उद्योग चालविला आहे़ घटना त्यांनाच मान्य नसल्याचे यावरून लक्षात येते.हाच आमचा विजयआतापर्यंत बारामतीमध्ये किती मताधिक्याने विजय होणार अशी चर्चा चालायची़ पण यावेळेला सांगता येत नाही बुवा, येथपर्यंत आम्ही निवडणूक आणून ठेवली आहे़ हाच आमचा विजय आहे़ शरद पवार यांनी सर्व गोष्टींचे जपून विश्लेषण करावे़ सर्व विश्लेषण त्यांच्या अंगाशी येत आहे़ पवार कुटूंबातील एकही उमेदवार निवडून येणार नाही़, हे मी ठामपणे सांगत आहे़ बारामतीमध्ये त्यांची मुलगी तसेच मावळात नातू हरणार आहे़ प्रत्येक माणूस शेवटी कुटूंबाचा विचार करतो, अशी खिल्ली उडवत चंद्रकांत पाटील म्हणाले, पवार हे खूप मोठे आहेत. मी एका सर्वसामान्य कुटुंबातील गिरणी कामगाराचा मुलगा आहे. ज्या झाडाला आंबे त्याला दगड मारण्याचा प्रकार ते करीत असतात.२-३ जागावरच यशराष्टÑवादी कॉँग्रेसने राज्यात २०-२२ जागा लढविल्या पण त्यांना यश दोन-तीन जागांवरच मिळणार आहे, असे असताना पवार हे पंतप्रधान होण्याचे स्वप्न पहात आहेत. या देशात कुणालाही काहीही व्हावेसे वाटते, अशी टीकाही त्यांनी केली.
ईव्हीएमवर टीका ही शरद पवारांना पराभवाची चाहूल - चंद्रकांत पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 12:34 PM