कुंदन पाटील -जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात सुरु असलेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या मंडपाखाली जनतेच्या पैशांची उधळण सुरु असल्याची टीका होऊ लागली आहे. तशातच पाचोरा येथील कार्यक्रम आटोपून १० दिवस होत नाही तोच आणि तिथल्या कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपापोटी बिल सादर केले नसतानाही ५० लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने सोयीच्या राजकारणासाठी जनतेच्या पैशांची उधळण सुरु केली असल्याची टीका आता राजकीय क्षेत्रात होऊ लागली आहे.
दि.१२ रोजी पाचोऱ्यात ‘शासन आपल्या दारी’ हा तालुकास्तरीय पहिला कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचे तीनदा संभाव्य दौरे रद्द झाले. त्यामुळे दि.७ सप्टेंबर रोजीपासून टाकण्यात आलेला मंडप सलग ६ दिवस ‘जैसे थे’च होता. साहजिकच त्याचा भार राज्य शासनाच्या तिजोरीवर पडणार असल्याचे समीकरण निश्चीत झाले होते. तशातच मंगळवारी या कार्यक्रमासाठी असलेल्या मंडपाचे बिल अदा करण्यासाठी ५० लाखांचा निधी राज्य शासनाकडून प्राप्त झाला आहे. बिल सादर झाले नसतानाही आणि प्रशासकीय मान्यता मिळाली नसतानाही राज्य शासनाकडून वाटल्या जाणाऱ्या ‘खैराती’विषयी अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
जळगावसाठी ५० लाख तर....जळगाव येथे जिल्हास्तरीय शासन आपल्या दारी कार्यक्रम झाला होता. त्यासाठी तीन मोठे डोम उभारण्यात आले होते. त्यानंतर संबंधित तीन डोमपोटी सादर केलेल्या बिलापोटी १ कोटींच्या खर्चाला प्रशासनाने मंजुरी दिली होती. त्यापोटीही ५० लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. जळगावच्या कार्यक्रमातील डोमच्या तुलनेत पाचोऱ्यात एकमेव डोम उभारण्यात आला होता. तरीही डोमच्या बिलापोटी ५० लाखांचा निधी राज्य शासनाने सहजच उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे मंडपांआड ‘पैशांचा खेळ चाले’ अशा शब्दात विरोधकांनी आता टीका करायला सुरुवात केली आहे.
पाचोऱ्यातील कार्यक्रमासाठी उभारण्यात आलेल्या मंडपाचे बिल अद्याप सादर करण्यात आलेले नाही. मात्र ५० लाखांचा निधी बॅंक खात्यात जमा झाला आहे.-भूषण अहिरे, प्रांताधिकारी, पाचोरा.
‘शासन आपल्या दारी’च्या नावाखाली पैशांची लूट सुरु आहे. या कार्यक्रमासाठी होणारा करोडांचा खर्च शेतकऱ्यांसाठी हितासाठी वापरला असता तर बरे वाटले असते. मात्र मुख्यमंत्र्यांनी समर्थकांसाठी सुरु केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘लूट मोहिम’ सुरु केली आहे.-संजय सावंत, संपर्क प्रमुख, शिवसेना (उद्धव ठाकरे गट)