पोलीस वसाहती मधील घटना : अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक
अग्निशमन विभागाची कामगिरी : आतून लावली होती कडी
जळगाव : घरात खेळत असताना दीड वर्षीय बालकाने आतून अचानक कडी लावून घेतल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी पोलीस वसाहतीमध्ये घडला. घटनेची माहिती मिळताच तात्काळ मनपा अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काही मिनिटात बालकाची सुखरूप सुटका केली.
मनपा अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार पोलिस शिपाई अरुण पाटील हे आपल्या कुटुंबासह पोलीस वसाहतीमध्ये राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांचा मुलगा स्वयम हा किचन मध्ये खेळत होता तर आई घराबाहेर काम करत होत्या. यावेळी स्वयम याने खेळताना किचनच्या दरवाजाची आतून कढी लावली. जुन्या काळातील दरवाजा असल्याने, त्याला खाली व वरही कडी होती. बालकाने खेळताना खालची कडी लावली. त्यानंतर दरवाजा उघडता येत नसल्याने स्वयम याने मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. अरूण पाटील हे ड्युटीवर असल्याने गल्लीतील नागरिकांनी प्रयत्न करूनही कडी उघडत नव्हती. शेवटी अग्निशमन विभागाला कळविण्यात आले.
इन्फो :
बालकाची झाली काही मिनिटात सुटका
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे कर्मचारी तात्काळ फायर फायटर सह घटनास्थळी रवाना दाखल झाले. यावेळी त्यांनी '' हायड्रोलीक टॅम्बो स्टूल ''आणि ''डोअर ब्रेकर'' या साहित्याने दरवाजा उघडा केला व बालकाला सुखरूप बाहेर काढले. नागरिकांनी अग्निशमन अधिकारी शशिकांत बारी, सुनील मोरे, देवीदास सुरवाडे, रोहिदास चौधरी,भगवान पाटील यांचे आभार मानले.