कोरोना काळात राज्य परिवहन महामंडळाची सहा महिने बससेवा बंद होती. यामुळे महामंडळाचे करोडो रुपयांचे उत्पन्न बुडाले. हे नुकसान भरून काढण्यासाठी महामंडळ प्रशासनाने आता प्रवाशी सेवेबरोबर गेल्या महिन्यापासून पर्यटन सेवाही सुरू केली आहे. त्यानुसार महामंडळाच्या जळगाव आगारातर्फे गेल्या महिन्यापासून जळगाव ते शेगाव ही तीर्थयात्रा सेवा सुरू केली आहे. जळगाव आगारातून दर शनिवारी ही सेवा सुरू उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेसाठी प्रवाशांना ऑनलाईन आरक्षणाचीही सुविधा देण्यात आली असून, एक रात्र शेगाव मुक्कामी राहून पुन्हा जळगावला रवाना होत आहे.
इन्फो :
कोरोनामुळे सेवा मात्र बंद
कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाल्यानंतर जळगाव आगारातर्फे पहिल्यांदाच पर्यटन उपक्रमांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली होती. जळगावहून थेट शेगावसाठी प्रवाशांची संख्या कमी असली तरी बोदवड, मलकापूर, अकोला या मार्गावरील प्रवाशांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे महामंडळातर्फे ही सेवा नियमित करण्याचे नियोजन सुरू आहे. मात्र, आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे शेगाव येथील श्री गजानन महाराजांचे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच अकोला शहरातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव आगारातर्फे शेगावची बससेवा बंद ठेवण्यात आली असल्याचे
आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.