लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने गेल्या वर्षी अनेक नागरिक अडकून पडले होते. रेल्वे व बससेवा बंद असल्याने अनेकांना घराकडे दोन-दोन महिने जाता आले नाही, यंदा काही प्रमाणात परिस्थिती निवळली असली तरी, सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णपणे सुरू झालेली नाही. त्यामुळे या अडकून पडलेल्या नागरिकांना शहरातील मनपाचे रात्र निवारा केंद्र मोठा आधार ठरत आहे. या ठिकाणी राज्यातील नव्हे तर राजस्थान, गुजरात तर थेट नागपूर येथील नागरिक आश्रय घेत असल्याचे 'लोकमत' प्रतिनिधीने केलेल्या पाहणीतून दिसून आले.
शहरातील नवीन बस स्थानकाच्या पाठीमागे जळगाव मनपा प्रशासनातर्फे तीन वर्षांपासून शहरी बेघर निवारा केंद सुरू केले आहे. सध्या परभणी येथील आदित्य ढवळे पाटील या सेवाभावी संस्थेतर्फे हे रात्र निवारा केंद्र चालविले जात होते. गेल्या वर्षी हे केंद्र जळगावातील केशव स्मृती प्रतिष्ठान तर्फे चालविले गेले. यंदा मात्र मनपातर्फे आदित्य ढवळे पाटील या संस्थेकडे सोपविण्यात आले आहे. या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना संबंधित संस्थेतर्फे सकाळी चहा, नाश्ता, जेवण व पुन्हा सायंकाळी चहा, नाश्ता जेवण दिले जात आहे. नागरिकांना झोपण्यासाठी स्वतंत्र आसन असून, सकाळी अंघोळीसाठी गरम पाण्याची सुविधाही करण्यात आली आहे. तसेच करमणुकीसाठी टीव्ही संचही उपलब्ध करून देण्यात आला आहे.
इन्फो :
मनपा प्रशासनातर्फे दाखल केले जाते केंद्रात
मनपाच्या महिला व बाल कल्याण विभागाचे कर्मचारी आठवड्यातून एकदा रात्रीच्या वेळी शहरातील विविध भागात फिरत असतात. यामध्ये विशेषतः रेल्वे स्टेशन, बस स्टँड, टॉवर चौक, फुले मार्केट आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी करून, या ठिकाणी जे नागरिक रस्त्यावर झोपलेले आढळतील, त्यांना या रात्र निवारा केंद्रात असतात. विशेष सार्वजनिक ठिकाणी आढळून येणाऱ्यांमध्ये बहुतांश नागरिक हे वयोवृद्ध असल्याचे आढळून आले आहेत. या नागरिकांना तात्काळ मनपाच्या वाहनातून या केंद्रात दाखल करण्यात येत आहे.
इन्फो :
लॉकडाऊन काळात ५० हून अधिक जणांनी घेतला आश्रय
शासनातर्फे गेल्या वर्षी आणि आताही लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मध्ये अनेक जण या ठिकाणी येऊन आश्रय घेत आहेत. विशेष लॉकडाऊन मध्ये अडकलेले अनेक वयोवृद्ध व नागरिकांनी स्वतःहून या ठिकाणी संपर्क साधून रात्र निवारा केंद्रात आश्रय घेतला. यामध्ये राजस्थान, सुरत, नागपूर, अकोला, मुंबई येथील नागरिकांचा समावेश होता. यातील काही नागरिक घराकडे परतत असून, २० बेघर नागरिक मात्र याच ठिकाणी आश्रय घेत आहेत. दरम्यान, या ठिकाणी नागरिकांची नियमित आरोग्य तपासणी होत असून, २४ तास सबंधित संस्थेचे कर्मचारी निवारा केंद्रात मुक्कामी राहत असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो :
या रात्र निवारा केंद्रात लॉकडाऊन काळात अनेकांनी आश्रय घेतला. शहरातील बेघर नागरीकांना या ठिकाणी दाखल केले जाते. त्यांना आम्ही घराप्रमाणे सर्व सुविधा देत असून, एक कुटुंबाप्रमाणे या ठिकाणी नागरिक राहत असतात.
मनीषा पारधी, व्यवस्थापक, रात्र निवारा केंद्र