ऑनलाईन लोकमत
कु:हाकाकोडा, ता.मुक्ताईनगर,दि.18 - भुसावळ तालुक्यातील आदीवासी पाडे गुन्हेगारीचे आश्रयस्थान बनू पाहात आहेत. या भागात बनावट नागमणी व मांडूळ तस्करी बिनबोभाट सुरू असतांना आता दरोडय़ातही सहभाग दिसून आला आहे. अन्य जिल्ह्यात गुन्हे करुन आल्यानंतर आरोपींना या पाडय़ांवर सहारा दिला जात असल्याचे समोर आले आहे.
धुळे जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून खून केल्या प्रकरणी चारठाणा (मदापुरी) येथून दोघां आरोपींना अटक झाल्यानंतर सातपुडय़ाच्या पायथ्याशी वसलेल्या आदिवासी पाडय़ांवर गुन्हेगारांना आश्रयस्थान मिळत असल्याचे सिद्ध झाले आहे.
आता या गुन्हेगारांचा दरोडय़ा सारख्या गंभीर गुन्ह्यांकडे कल वाढला आहे. पैशांच्या हव्यासापोटी ते रात्रीच्यावेळी दरोडे टाकत आहेत.यात एखाद्या निष्पाप माणसाचा जीव जातो. धुळे येथील दरोडा आणि खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आल्याने आदीवासी पाडय़ांवर गुन्हेगारांना आश्रय मिळतो ही बाब समोर आली आहे.
अवैध व्यवसायाचे केंद्र..
मुक्ताईनगर तालुक्यातील मदापुरी, लालगोटा, हलखेडा, जोंधनखेडा ही गावे डोंगराच्या पायथ्याशी असून आदिवासी बहुल आहेत. या गावांमध्ये बनावट नागमणी, मांडूळ तस्करी, करंटचे भांड आदींचा अवैध व्यवसाय मोठय़ा प्रमाणावर चालतो. परप्रांतीय ग्राहकांना इकडे बोलावून त्यांना लाखोंचा चुना लावला जातो. तसेच त्यांच्याकडील दागदागिने व महागडे मोबाईल हिसकावून त्यांना बेदम मारहाणही केली जाते. यामध्ये आलेला पैसा हा काळा पैसा असल्यामुळे पोलिसांकडे तक्रार द्यायला जात नाहीत.त्यामुळे बनावट नागमणी विकणारांचे फावते.
परप्रांतात करतात गुन्हे
दरोडे टाकण्यासाठी गुन्हेगार हे परजिल्ह्यात व परप्रांतात जातात. गुन्हा केल्यानंतर ते याच आदिवासी गावांमध्ये लपून राहतात. धुळे जिल्ह्यात दरोडा प्रकरणातही चारठाणा येथील गुन्हेगारांनी मोबाईल पळविले व त्या मोबाईलच्या लोकेशनमुळेच पोलीस त्यांचा माग काढू शकले. अन्यथा हा प्रकार उघड झाला नसता. या भागात लोकांना नागमणी घेण्यासाठी बोलावून त्यांना अक्षरश: ओरबाडले जाते. विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जाते. हे प्रकार आता नित्याचे आहेत.