जळगाव: भाजप कार्यालयात अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्का बुक्की तसेच टॉवर चौकात डुकरे सोडल्या प्रकरणी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभुषण पाटील यांच्यासह २५ जणांविरुद्ध मंगळवारी रात्री दहा वाजता शहर पोलीस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Shiv Saina protest against Narayan Rane file case against 25 people including mayor in jalgaon)
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपशब्द वापरल्याने शिवसेनेच्या वतीने महापौर जयश्री महाजन उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे प्रीतम शिंदे शोभा चौधरी सरिता कोल्हे व इतरांनी राणे यांचा निषेध म्हणून शहरात आंदोलन केले. टॉवर चौकात डुकरे सोडून राणे यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. त्यानंतर महापालिकेच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी केली. तेथून भाजपच्या वसंत स्मृती या कार्यालयास अनधिकृतपणे प्रवेश करून पक्ष कार्यकर्त्यांना धक्काबुक्की केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी मुंबई पोलीस अधिनियम सदतीस तीनशे उल्लंघन देखील केलेले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी कमलेश भगवान पाटील यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.