पाचोरा : विधानसभेला पराभव झाल्याचा धक्का पाचोरा तालुक्याचे भाजप अध्यक्ष अमोल शिंदे विसरलेले नसून आमदार किशोर पाटील यांनी कोरोना काळात आपल्या मतदारसंघात किराण्यापासून ते औषधांपर्यंत तसेच रेमडेसिविरपासून फ्रंटलाइन वर्कर्स यांच्यासाठी उकडलेले अंडे पोहाचविण्यापर्यंत सेवा केली असून पाचोरा भडगाव मतदारसंघात विकासकामे वेगात केली असून, अमोल शिंदे नैराश्यातून आमदार किशोर पाटील यांच्यावर बेताल, बेछूट तथ्यहीन आरोप करत असल्याचे शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष अभय पाटील यांनी म्हटले आहे.
शिंदे यांनी तालुक्याच्या विकासासाठी आणि जनतेच्या प्रश्नासाठी लोकआंदोलन करावीत, असा सल्लादेखील दिला आहे. अमोल शिंदे यांनी आमदारांवर केलेल्या टीकेचे उत्तर देताना शिवसेना उपजिल्हाध्यक्ष यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघाप्रमाणेच देशात महागाईने उच्चांक गाठलेला असून, पेट्रोल १०० रुपयांपेक्षा जास्त, तर डिझेल १०० रुपयापर्यंत पोहचले आहे. तरी व दैनंदिन अन्नधान्य, भाजीपाला प्रचंड महाग झाला तरी शिंदे या प्रश्नावर एक शब्दानेही बोलायला तयार नाहीत, असे पाटील यांनी म्हटले आहे. भाजप पदाधिकारी प्रश्न सोडविण्यापेक्षा दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये मग्न असल्याचे त्यांनी सांगितले.
चाैकट
केंद्राच्या या निर्णयाने जळगावातील शेतकऱ्यांचे नुकसान
२०२०मध्ये भाजपने जिल्ह्यात दूध दरवाढीच्यासंदर्भात आंदोलन केले. त्याचा अगोदर केंद्र सरकारने देशात अमेरिकेच्या दूध उत्पादनासाठी व अमेरिकेच्या डेअरी उद्योगाला फायदा पोहचविण्याचा उद्देशाने देशाची बाजारपेठ खुली केली. यामुळे जळगावसह देशातील दूध उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. दूध आयातीचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यामुळे देशात अतिरिक्त उत्पादन होत असलेल्या दुधाला योग्य भाव मिळत नाहीत. हे सत्य सांगायची भाजपा तालुकाध्यक्ष यांना लाज वाटत असावी, असे ते म्हणाले.