जळगाव : राष्ट्रपती राजवट लागू होणे हा एक प्रक्रियेचा भाग आहे. पुढे आता चर्चा होऊन भाजप पुन्हा सत्तास्थापनेचा दावा करू शकतो असा दावा जिल्ह्यातील भाजप आमदार व जिल्हाध्यक्षांनी केला आहे. राज्यातील जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला असताना केवळ शिवसेनेच्या अट्टाहासामुळे राज्यात सध्याची स्थिती उद््भवली असल्याचे सांगत शिवसेनेने जनादेशाचा अपमान केला असल्याचा आरोपही भाजपतर्फे करण्यात येत आहे.विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना व मित्र पक्षांची महायुती झाली. यात जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला व भाजप-शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले. मात्र शिवसेनेच्या अट्टाहासामुळे महायुतीचे सरकार स्थापन होऊ शकले नाही, अशा प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवित सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने वेळेवर पाठिंब्याचे पत्र न दिल्याने शिवसेनेची नाचक्की झाल्याचेही भाजप आमदार व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्यातील सध्याच्या स्थितीला केवळ शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात येत आहे.राष्ट्रपती राजवट लागू होणे हा प्रकियेचा भाग आहे. यात केव्हाही सरकार स्थापन होऊ शकते. त्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करीत असून ज्याच्याकडे १४५ आमदार असतील त्यांचे सरकार स्थापन होईल. भाजपही पुन्हा दावा करू शकते.- आमदार सुरेश भोळे, भाजप जिल्हा महानराध्यक्ष.राज्यातील जनतेचा जनादेश महायुतीच्या बाजूने असताना शिवसेनेने या जनादेशाचा अपमान केला आहे. राज्यातील स्थितीला केवळ शिवसेनाच जबाबदार आहे.- आमदार मंगेश चव्हाण.विधानसभा निवडणुकीसाठी महायुती झाली व त्याबाजूने कौल मिळालेला असताना शिवसेनेने अट्टाहास करायला नको होता. ज्यांच्या शब्दावर शिवसेनेने सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला त्यांचे अखेर पत्रही मिळू शकले नाही. आता पुन्हा चर्चा होऊन भाजप सत्ता स्थापन करू शकते.- डॉ. संजीव पाटील, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) भाजप.
शिवसेनेने जनादेशाचा केला अपमान - भाजप आमदारांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:14 PM