प्रशांत भदाणे
जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह काही आमदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्याने ठाकरे सरकारचे अस्तित्व धोक्यात आलंय. त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. बंडखोरांच्या विरुद्ध ते संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर देखील या साऱ्या राजकीय घडामोडींचे पडसाद उमटले आहेत. शिवसेनेचे जळगाव जिल्ह्याचे संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी अशाच प्रकारे आपल्या संतप्त भावना व्यक्त करणारे एक पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल केलंय. हे पोस्टर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलं आहे.
काय आहे नेमकं पोस्टरमध्ये?संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी या पोस्टरमध्ये आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्याचं दिसून येतंय. या पोस्टरमध्ये वरच्या बाजूला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत आनंद दिघे यांचे फोटो असून, त्यामध्ये 'शिवसेना ही बाळासाहेबांचीच' असा मजकूर आहे. तर खालच्या बाजूला शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि मराठी चित्रपट अभिनेते प्रसाद ओक यांचे फोटो असून, त्यामध्ये 'डुप्लिकेटांची नाही' असा मजकूर आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेलं हे पोस्टर खूपच चर्चेत आलंय.
पोस्टरबद्दल संजय सावंत काय म्हणाले? हे पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर 'लोकमत'ने संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तेव्हा सावंत म्हणाले की, शिवसेना ही खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचीच आहे. शिवसेना ही बंडखोरी करणाऱ्या डुप्लिकेट लोकांची मूळीच नाही. आपण आपल्या मनातील भावना या पोस्टरच्या माध्यमातून व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले.