जळगाव : मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणाऱ्या व केवळ पदे मिळवून ताफा घेऊन फिरणाऱ्या खान्देशातील नेत्यांनी येथील लोककला व कलावंतांसाठी काय केले, असा सवाल करीत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे यांना रविवारी पुन्हा एकदा जळगावात टोला लगावला. खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठानच्यावतीने खान्देशातील पहिले वहीगायन लोककला संमेलन रविवार, २० फेब्रुवारी रोजी जळगाव येथे झाले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी गुलाबराव पाटील बोलत होते. त्यावेळी त्यांनी खडसे यांचे नाव न घेता त्यांना कलावंतांच्या प्रश्नावरून टोला लगावला.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीपासून गुलाबराव पाटील व खडसे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. त्यात दोन दिवसांपूर्वीच गुलाबराव पाटील यांनी अहमदनगर येथे एका कार्यक्रमात आमच्याकडे खडसे यांच्यासारखे डाकू आहे, असे वक्तव्य केले होते. त्याला प्रत्युत्तर देताना शनिवारी खडसे यांनी नशिराबाद येथे गुलाबराव पाटील हे उच्च शिक्षित, निर्व्यसनी असल्याचा टोला लगावत चोर संबोधले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा पाटील यांनी खडसे यांना टोला लगावला.
जिल्ह्यात काय दिवे लावले?
खान्देशातील लोककला असो की कलावंतांचे प्रश्न असो, या विषयी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, खान्देशातील नेत्यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहिली. आपण मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होतो, असा दावा करीत केवळ पदे मिळविण्याची कामे या नेत्यांनी केली. पदे मिळवायची व ताफा मागे घेऊन फिरायचा एवढेच त्यांना करता आले. जिल्ह्यासाठी काय काम केले व काय दिवे लावले, असा सवालही पाटील यांनी करीत खडसे यांना चिमटा काढला. यात नाव घेतले नसले तरी ज्यांनी ही स्वप्ने पाहिले, त्यांना हा प्रश्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट करून टाकले.
‘नाक खाजे, नकटी खिजे’
खडसे यांना डाकू म्हटल्याविषयी पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, डाकू हा बोलीतील प्रचलित शब्द आहे. मी आमच्याकडे गिरीश महाजन, एकनाथ खडसे यांच्यासारखे डाकू असल्याचे म्हटले होते. त्याचा अर्थ ते बंदूक घेऊन फिरणारे डाकू आहे, असा होत नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. ‘नाक खाजे, नकटी खिजे’, असा अशी गत झाली असून त्यांना दुसरा धंदा उरला नसल्याचेही शेवटी त्यांनी बोलून दाखविले.
औरंगाबादचा पाणी प्रश्न लगेच मार्गी लावणार
औरंगाबाद येथील पाणीपुरवठा योजनेचे काम रखडले असून ते काम लवकरात लवकर न झाल्यास आंदोलनाचा इशारा केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी दिला होता. त्याविषयी गुलाबराव पाटील म्हणाले, कोरोनामुळे काही दिवस कामाची गती कमी होती. मात्र आता त्याची उद्याच चौकशी करतो व ते काम मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी जळगावात दिली.