अजय पाटीलजळगाव : राज्यात शिवसेना-भाजपने मिळून सत्ता स्थापन करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या अनेक आमदारांची आहे. पक्षातील फुट टाळण्यासाठी भाजपसोबत जाण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत माझ्यासह काही आमदारांनी विनंती केली. मात्र,याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यातच सर्वच आमदारदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात असल्याने सेनेचे हित लक्षात घेवून, शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.
शिवसेनेत झालेल्या राजकीय भूकंपानंतर शिवसेनेचे ३५ आमदार शिंदे गटात सहभागी झाले. बुधवारी सकाळी १० वाजेपर्यंत गुलाबराव पाटील हे मुंबईलाच थांबून होते. मात्र, शिवसेनेकडून शिंदेचे बंड रोखण्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने गुलाबराव पाटील यांनी देखील शिंदे गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी दुपारी १२ वाजता मुंबईहून सूरतसाठी रवाना झाले. रात्री उशीरापर्यंत सूरतलाच थांबणार होते. त्यानंतर गुवाहाटीला रवाना होणार असल्याचीही माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली.
फडणवीस, महाजन यांनीही साधला संपर्कजळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील वगळता सर्वच आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाल्यामुळे केवळ गुलाबराव पाटील हेच एकमेव शिवसेनेत थांबून होते. मंगळवारी रात्री विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधून, त्यांना शिंदे गटात सहभागी होण्याबाबतचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच याबाबत गुलाबराव पाटील यांनी देखील दुजोरा दिला आहे.
वेगळा गट नाही, आम्ही शिवसेनेतगुलाबराव पाटील यांना आता गट स्थापन होणार की शिवसेना कायम राहणार याबाबत विचारले असता, त्यांनी वेगळा गट स्थापन केला जाणार नसल्याचे सांगितले. शिवसेना म्हणून आम्ही कायम राहणार असल्याचे सांगितले. तसेच भविष्यात सरकार झाल्यास शिवसेनेचा पाठींबा राहणार असल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगितले.