जळगाव : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघातील युवासेना व शिवसेना महिला आघाडीच्या महत्वपुर्ण बैठकीचे आयोजन शनिवारी दुपारी २ वाजता अजिंठा विश्रामगृह येथे करण्यात आले आहे. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील व युवासेना विस्तारक कुणाल दराडे हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, लता सोनवणे, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, महानगराध्यक्ष शरद तायडे आदी उपस्थित राहणार आहेत.
शासकीय तंत्रनिकेतन निर्जंतुकीकरण
जळगाव : कोरोना काळामध्ये शासकीय तंत्रनिकेतन, जळगाव मधील वसतिगृह महापालिकेने अधिग्रहित करून तेथे कोविड केंद्र सुरु केले होते. आता शहरात कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने हे कोविड केंद्र बंद करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या नवीन परिपत्रकानुसार १५ फेब्रुवारीपासून सर्व महाविद्यालये सुरु करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर उपमहापौर सुनिल खडके यांनी याबाबत मनपा प्रशासनाला सूचना करून, हे महाविद्यालय निर्जंतुकीकरण करण्याचे आदेश दिले होते.
नेहरू युवा केंद्रातर्फे ‘एड्स'विषयी जनजागृती
जळगाव : जिल्ह्यात एचआयव्ही एड्स दिनानिमित्त नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्ह्यातील २० प्रमुख गावात मोठ्याप्रमाणात जनजागृती करण्यात आली. केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या नेहरू युवा केंद्र जळगाव आणि जिल्हा एड्स प्रतिबंध नियंत्रण विभागातर्फे १ डिसेंबर जागतिक एचआयव्ही एड्स दिनापासून जिल्ह्यात जनजागृती मोहीम सुरू केली होती. नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी नरेंद्र डागर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मंडळ आणि स्वयंसेवकांच्या सहकार्याने २० खेड्यात पथनाट्ये सादर करून भित्तिचित्रे साकारण्यात आली.
दिवसा उन्हाळा तर रात्री हिवाळा
जळगाव - गेल्या दोन दिवसांपासून जळगावकरांना एकाचवेळी दोन ऋतुं अनुभवावयास मिळत आहेत. दोन दिवसांपासून रात्रीचा पारा हा १० अंशापेक्षा खाली गेला आहे. तर दिवसाचा पारा ३४ अंशापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कडक थंडी तर दिवसा उन्हाचे चटके असे वातावरण निर्माण झाले आहे. गुरुवारी देखील रात्रीचा पारा ९ अंशावर तर दिवसाचा पारा ३४ अंशावर पोहचला होता. या दुहेरी वातावरणामुळे रुग्णांची संख्या वाढत आहे.
रोटरी सेंट्रल तर्फे रविवारी मोफत लेसर उपचार शिबिर
जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव सेंट्रल तर्फे रविवार दि. १४ रोजी टागोर नगर समोरील भास्कर मार्केट जवळ शिल्प कॉस्मेटिक क्लिनिक येथे मोफत लेसर उपचार शिबिराचे आयोजन केले असल्याचे अध्यक्ष प्रा. डॉ.अपर्णा भट-कासार व प्रकल्प प्रमुख डॉ.राहुल मयुर यांनी सांगितले.
या शिबिरात डॉ.शुभा महाजन या रुग्णांची तपासणी करुन मार्गदर्शन करणार आहे. ज्यांना जन्मखुणा, चेहर्यावरील डाग, व्रण, गोंदण तसेच मुरुमांमुळे व कांजण्यामुळे डाग, स्ट्रेच मार्क, डार्क सर्कल, वांग, मानेवरील काळेपणा, चेहर्यावर असलेले केस कायमचे कमी करणे या विषयी गरजू रुग्णांची मोफत तपासणी करणार आहे. शिबिराचा फायदा घ्यावा, असे आवाहन मानद सचिव जितेंद्र बरडे, मेडिकल कमेटी चेअरमन डॉ.अनंत पाटील यांनी केले आहे.