लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : एप्रिल २०२० या कालावधीत जळगाव आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेल्या बीएस ४ वाहनांची माहिती चोपडाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनीही जुलै २०२० मध्ये आरटीओ कार्यालयातून मागविली होती. दरम्यान, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांचीही नाशिक पोलीस आयुक्तालयात चौकशी झाली आहे. उपायुक्त संजय बारकुंड यांनी त्यांचा लेखी जबाब नोंदवून घेतला आहे.
आरटीओतील निलंबित मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात आरटीओतील भ्रष्टाचाराबाबत १४ पानांची तक्रार दिलेली आहे. मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या, पदोन्नत्या व वाहन नोंदणीतील गैरव्यवहाराचा त्यात उल्लेख केला आहे. धुळ्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी जळगाव आरटीओ कार्यालयात एप्रिल २०२० या महिन्यात बीएस-४ ची २४०० वाहनांची नोंदणी केली व प्रत्येक वाहनामागे १२ हजार रुपये लाच स्वरूपात घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. कळसकर यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत तर जळगावचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी या काळात फक्त १५७ वाहनांची नोंदणी झाल्याचे सांगितले आहे.
शिवसेना आमदारांनी माहिती घेतली पण...
चोपडा मतदार संघाच्या शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांनी २३ जुलै २०२० रोजी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना पत्र देऊन २३ ते ३१ मार्च २०२० आणि २८ ते ३० एप्रिल या दरम्यान नोंदणी झालेल्या वाहनांची माहिती मागविली होती. आरटीओ कार्यालयाने आमदारांना ही माहिती पुरविलेली आहे. दरम्यान, गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावरही आरोप केलेले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांनी आरटीओ कार्यालयातून गेल्या वर्षी हीच माहिती घेतली होती. परिवहन मंत्री परब व आमदार सोनवणे दोघेही एकाच पक्षाचे आहेत. तर गजेंद्र पाटील यांनी याच कालावधीतील वाहन नोंदणी विषयी तक्रार केली आहे. त्यामुळे एकूणच या प्रकरणात संशयकल्लोळ निर्माण झालेला आहे.
कोट....
वाहन नोंदणीबाबत आरटीओकडून माहिती घेतलेली आहे. याप्रकरणी अजून तरी कुठे तक्रार केलेली नाही. पण आता तक्रार करणार आहोत. विधानसभेतच हा मुद्दा मांडायचा होता, परंतु कोरोनामुळे कामकाज चालले नाही. येणाऱ्या अधिवेशनात हा मुद्दा आपण लावून धरू.
- लता चंद्रकांत सोनवणे, आमदार