लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात शिवसेना महानगरच्यावतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आगळे-वेगळे आंदोलन केले. गॅस, पेट्रोल व डिझेल पाळण्यात टाकून पाळणा गीत म्हणत इंधनदरवाढीचा निषेध करण्यात आला. केंद्र शासनाने सत्तेत येण्याअगोदर इंधनदरवाढ कमी करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेत आल्यानंतर हे दर कमी न होता, वाढतच जात असल्याने केंद्र शासनाच्या विरोधात हे अनोखे आंदोलन असल्याची माहिती शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. या आंदोलनात केंद्र शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला.
राज्यभरात शिवसेनेकडून गॅस, पेट्रोल व डिझेल इंधनदरवाढी विरोधात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. शिवसेना महानगर व महिला आघाडीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोखे आंदोलन करुन केंद्र शासनाचा निषेध करण्यात आला. शिवसेनेचे महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, श्याम कोगटा, महिला आघाडीच्या सरिता माळी, मंगला बारी, शोभा चौधरी, मनीषा पाटील, शिवसेनेचे नगरसेवक गणेश सोनवणे, वसीम खान, संजय कोल्हे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर इंधन दरवाढ कमी करण्याबाबत शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील देण्यात आले.
केंद्र शासनाचे करायचे काय ?, खाली डोके वरती पाय
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी फुलांनी सजविलेला पाळणा आणला होता. या पाळण्यात गॅस, पेट्रोल व डिझेल ठेवण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी झो बाळा झो रे झो … पाळणा गीत म्हणत त्यातून इंधनदरवाढीसह केंद्र शासनाचा निषेध नोदवला. यावेळी ‘केंद्र सरकारचे करायचे काय ? ..खाली डोके वरती पाय…. अशी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.