लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शिवसेनेचे स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांनी गुरुवारी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याकडे सादर केला आहे. शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी अमर जैन यांना गेल्या आठवड्यात राजीनामा देण्याबाबतचे आदेश दिले होते. त्यानुसार अमर जैन यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेकडून संघटनेचा महापालिकेतदेखील काही प्रमाणात बदल करण्यात येणार आहेत. त्यानुसार शिवसेनेने आपले स्वीकृत नगरसेवक अमर जैन यांचा राजीनामा घेतला आहे. दरम्यान, नवीन नगरसेवक पदासाठी नाव निश्चित करण्याचे सर्व अधिकार पक्षाने शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन लढ्ढा यांना दिले आहेत. आठवडाभरात नितीन लढ्ढा स्वीकृत नगरसेवक पदासाठी पदाधिकार्यांची निवड करून आपला अहवाल संपर्कप्रमुख संजय सावंत यांच्याकडे सादर करणार आहेत. शिवसेनेत एका स्वीकृत नगरसेवक पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. यामध्ये नीलेश पाटील, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, विराज कावडीया, नितीन सपके यांचे नाव आघाडीवर आहे. सर्व इच्छुकांकडून आपापल्या नावासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.