अजय पाटील, जळगाव - आगामी वर्षात लोकसभा व विधानसभेसोबतच होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी शिवसेना ठाकरे गट मिशन मोड वर आला आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान जळगाव तालुक्यातील ६७ गावांमध्ये ‘होऊ द्या चर्चा’ हे अभियान हाती घेतले आहे. या अभियानाची सुरुवात रविवारी तरसोदपासून सुरु झाली.
तर ९ ऑक्टोबर रोजी अभियानाचा समारोप आसोदा या गावात होणार आहे. हे अभियान जिल्हाभर राबविले जात असून, त्यात जळगाव तालुक्यात विशेष भर दिला जात आहे. जळगाव तालुक्यातील जवळ-जवळ सर्वच म्हणजे ६७ गावांमध्ये हे अभियान राबविले जाणार आहे. या अभियानात महाविकास आघाडीच्या कार्यकाळात झालेली कामे, सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारमधील गैरकारभार, दिलेली आश्वासन व शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत जनतेमध्ये जाऊन चर्चा केली जाणार आहे. या प्रकारचे अभियान जळगाव शहरात देखील प्रभागनिहाय राबविले जाणार आहे.