जळगाव : जिल्ह्यातील १० हजारांवर शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे. या शेतकऱ्यांना तातडीने पीकविम्यापोटी अग्रीमची रक्कम द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जळगाव शहरातील शिव कॉलनी स्टॉप येथील कृषी पीकविमा कंपनी कार्यालयावर शेण फेकून निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच शासन निर्णयाच्या पत्राची होळी करून सरकार विरुद्ध घोषणाबाजी केल्या.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शनिवारी दि. १६ सकाळी अकरा वाजता ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष प्रा. भाऊसाहेब सोनवणे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी शिव कॉलनी येथील कृषी पीकविमा कंपनीच्या बंद कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन केले. आंदोलनात संदीप चौधरी, डॉ. रमाकांत कदम, आबा कोळी, छगन खडसे, संजय मराठे, मुकेश पाटील, विनोद सपकाळे, विकास पाटील, दामू कुंभार, संजय कोळी, विजय लाड, अविनाश पाटील, सचिन चौधरी, किरण ठाकूर यांच्यासह शेतकरी व पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.
सरकार विरोधात घोषणाबाजी
शेतकरी पीक विम्यापासून वंचित असल्याने आंदोलनकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या. राज्य सरकारने २३ फेब्रुवारीला शासन निर्णय काढला होता, त्याची अंमलबजावणी होत नाही म्हणून त्या शासन निर्णयाच्या पत्राची होळी पीकविमा कंपनीच्या कार्यालयासमोर करून निषेध व्यक्त केला. तसेच या घटनाबाह्य सरकारने शेतकऱ्यांना फसविण्याचे काम केले, हे सरकार उद्योगपतींचे आदी घोषणाबाजी केल्या. तसेच शेतकऱ्यांना लवकर पीक विम्याची अग्रीम न मिळाल्यास मंत्री, आमदार, खासदारांना गावबंदी केली जाईल, असा इशारा उपजिल्हाप्रमुख प्रा. सोनवणे यांनी यावेळी दिला.