लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेवरील हुडकोच्या कर्जापोटी राज्य शासनाने २५३ कोटींची एकरकमी रक्कम हुडकोला अदा केली होती. त्यातील निम्मी रक्कम मनपाला राज्य शासनाला प्रत्येक महिन्यात ३ कोटी रुपयांप्रमाणे १२५ कोटी अदा करायचे असून, आतापर्यंत महापालिकेने ५३ कोटी रुपयांची आघाडी केली आहे. उर्वरित ७१ कोटी रुपयांची अदायकी राज्य शासनाने माफ करावी यासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून राज्य शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. याबाबत १२ मे रोजी होणाऱ्या महासभेत देखील याबाबत चर्चा होणार आहे.
हुडकाे या वित्तीय संस्थेकडूून घेतलेल्या कर्जाचा डाेंगर महापालिकेच्या खांद्यावरून कमी झाला असला तरी त्याच कर्जापाेटी शासनाला अजून ७१ काेटींचा भरणा करावा लागणार आहे. या कर्जापाेटी शासन हमीची ४७ काेटींची रक्कम भरावी लागणार आहे. एवढा माेठा आकडा मनपाला भरण्यासाठी अडचणी येतील. त्यामुळे ही संपूर्ण रक्कम माफ करण्याची विनंती राज्य शासनाकडे केली जाणार आहे. महापालिकेवरील हुडकोचे कर्ज तत्कालीन सत्ताधारी भाजपाने राज्यातील सरकारच्या माध्यमातून हुडकाचे कर्ज माफ करून घेतले हाेेते; परंतु महापालिकेने १२५ काेटी रुपये राज्य शासनाला दर महिन्याला ३ काेटी रुपये याप्रमाणे अदा करावे, असे ठरले हाेते. त्यानुसार महापालिका दर महिन्याला ३ काेटी रुपये अदा करत आहे. अजूनही शासनाला ७१ काेटी ४१ लाख ६९ हजार रुपये अदा करावे लागणार आहेत.
मनपावर अजूनही हुडको कर्जापोटी ११८ कोटी देणे बाकी?
हुडकाे कर्जाच्या हमीपाेटी महापालिकेने राज्य शासनाला दंडनीय व्याजासह ४७ काेटी ४६ लाख रुपये अदा करावेत, असे आदेश आहेत. त्यामुळे अजूनही मनपावर सुमारे ११८ काेटींचे कर्ज आहे. ही एवढी माेठी रक्कम मनपाला भरणे कठीण आहे. त्यामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने ही संपूर्ण रक्कम माफ करावी, अशी विनंती महापालिका करणार आहे. येत्या आठवड्यात यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून ताे शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तत्कालीन मनपातील सत्ताधारी भाजपाने राज्य शासनाच्या साहाय्याने हुडको कर्जापोटी १२५ काेटी माफ केल्यानंतर आता शिवसेनेकडून उर्वरित संपूर्ण रक्कम माफ करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनपात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली आहे. त्यात राज्यात देखील आता शिवसेनेचे मुख्यमंत्री असल्याने मनपा सत्ताधाऱ्यांनी उर्वरित रक्कम माफ करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
मनपाच्या महासभेत ७७ प्रस्तावांवर होणार चर्चा
१. महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेची सत्ता आली असून, शिवसेनेच्या नवनियुक्त महापौर जयश्री महाजन यांच्या कार्यकाळातील पहिलीच महासभा १२ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.
२. महासभेत एकूण ७७ प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. यामध्ये मनपा प्रशासनाकडून १५ विषय आले आहेत तर उर्वरित ६२ विषय पदाधिकाऱ्यांकडून आलेले आहेत. यामध्ये तत्कालीन भाजप सत्ताधाऱ्यांनी मनपा फंडातून ७० कोटी रुपयांच्या निधीतून घेतलेल्या रस्त्यांची कामे याबाबतचा केलेला ठराव रद्द करून. शहरातील नवीन रस्ते नगरोत्थान अंतर्गत राज्य शासनाने स्थगिती दिलेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून करण्याबाबतचा प्रस्ताव महासभेपुढे मांडण्यात येणार आहे.
३. यासह शहरातील मेहरुण तलाव परिसराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्याबाबतचा ठरावदेखील महासभेपुढे मांडण्यात येणार आहे. तसेच घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या पाच नगरसेवकांना अपात्र करण्याबाबतचा प्रस्तावदेखील महासभेपुढे सादर केला गेला आहे.