लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिका तसेच मुक्ताईनगर नगरपंचायतीमध्ये शिवसेनेने भाजपचा करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर महापालिकेत पुन्हा भाजपचे तीन नगरसेवक आपल्या बाजूने खेचत शिवसेनेने भाजपाचा करेक्ट कार्यक्रम केला आहे. नगरसेविका शोभा बारी, सुरेश सोनवणे व शबीनाबी शेख शरीफ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत शनिवारी मुंबईत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विशेष म्हणजे फुटलेल्या तीन नगरसेवकांमध्ये समावेश असलेले सुरेश सोनवणे हे मार्च महिन्यात झालेल्या महापौर, उपमहापौरपदांच्या निवडणुकीत हे भाजपचे उपमहापौरपदासाठीचे उमेदवार होते. सोनवणे यांनी पक्ष सोडल्यामुळे भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. तसेच सुरेश सोनवणे यांना भाजपने उपमहापौरपदाचा उमेदवार घोषित केल्यामुळे तेव्हा भाजपचे अनेक नगरसेवक उमेदवारीवरून नाराज झाले होते. भाजपचे तीन नगरसेवक फुटल्यामुळे महापालिकेत भाजपचे संख्याबळ ५७ वरून २७ वर आले आहे. तर, शिवसेनेचे संख्याबळ १५ वरून ४५ वर आले आहे.